
पोफळी : येथील नामवंत व निस्वार्थ सेवेचे प्रतीक असलेले कै. डॉक्टर शिवाजीराव दाजीरामशेठ मानकर ( वय वर्षे ६१) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काल, रविवार, (ता.८ जून) रात्री मुंंबई येथील घरी दुःखद निधन झाले. मुंबईतून त्यांचा मृतदेह आज पहाटे चिपळूणमध्ये अपरान्त हॉस्पिटल येथे आणून, शीतपेटीत ठेवण्यात आला आहे. त्यांचा अंत्यविधी आज रात्री ८ वाजता पोफळी येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने पोफळी पंचक्रोशीतील एक हरहुन्नरी, सेवाभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
डॉ. मानकर यांनी गेल्या अनेक दशकांपासून चिपळूण, रत्नागिरी आणि मुंबई येथे होमिओपॅथिक वैद्यकीय सेवा देत सामाजिक क्षेत्रातही आपली खास ओळख निर्माण केली होती. ते काही काळ तालुक्यातील राजकीय वर्तुळात सक्रिय होते. शिरगांव पोफळी पंचायत समिती गणातून त्यांनी निवडणूक ही लढविली होती. अत्यंत मनमिळावू, नम्र आणि सेवाभावाने कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, मुली, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.