उमेश फाले खूनप्रकरणी तपासाचा वेग वाढवण्याची कुटुंबीयांची मागणी

Edited by: लवू परब
Published on: August 30, 2024 11:57 AM
views 618  views

दोडामार्ग : उमेश फाले खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवून आम्हांला न्याय द्यावा. जो पर्यंत आमच्या उमेशचा मृतदेह मिळत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही आमचे धनगर समाज बांधव व इतर जनता सर्व रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी उमेश फालेचे काका संतोष फाले यांनी दिला आहे. 


त्यांनी दिलेल्या पत्रकारासमोर आज आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले की, उमेश फाले हा माझा पुतण्या 18 मे 2022 ला बेपत्ता झाला. 19  मे पासून आम्ही आमचे समाजबांधव मिळून त्याचा शोध केला. मात्र तो कुठेच मिळाला नाही. त्याच्यानंतर आम्ही बसस्थानक किंवा सार्वजनिक ठिकाणी ही शोध घेतला, त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून आम्ही कुडासे भोमवाडी ते दोडामार्ग व गोवा गेट पर्यंत त्याचा आम्ही शोध घेतला. मात्र त्याचा कुठेच थांग पत्ता लागला नाही. त्यानंतर आम्ही गोव्याला जाणारा तिलारी कलव्याचे पाणी बंद करण्यास लावले व त्या कालव्यात चौथ्या दिवशी पूर्ण कालव्यात उतरून आमचे 30 ते  40 समाज बांधवांनी त्याचा शोध घेतला. मात्र कुठेच तो आढळून आला नाही. त्यावेळी आम्ही गोवा तसेच कर्नाटक येथील पोलिसांना सदर उमेश फाले हा बेपत्ता असल्याचे आम्ही अर्ज दिला मात्र त्याठिकाणी त्याचा शोध लागला नाही. हळू हळू या विषयवाला 2 वर्षे झाली. आणि आज2 वर्षे 3 महिने आठ दिवस झाले. उमेश फाले याला उसप येथील काहीजणांनी त्याचा खून केल्याचे उघड झाले.

दोडामार्ग पोलिसांनी तपास करून 3 आरोपी ताब्यात घेतले. त्यांनीही कबुलीही दिली  उमेशला मारले आणि गोव्याच्या कालव्यात टाकले. जर त्यांनी कालव्यात मृतदेह टाकला तर तो गेला कुठे ? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी हे आपला जबाब खोटा देत असल्याचा आरोप संतोष यांनी केला. त्यांनी त्याला मारून कालव्यात टाकला नसावा अन्यत्र दफन केला असावा असा संशय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

खुनाचा उलघडा केला, आरोपी पकडले. मग खून झालेला मृतदेह पोलिसांना का मिळत नाही? या खुनामागे अजून काहींचा हात आहे  आहे. हे खून लपवण्यासाठी कोणीतरी दुसरा माणूस यांना किंवा पोलिसांना दबाव टाकत आहे असा आरोप करत येत्या दोन दिवसात पोलिसांनी याचा खुलासा उघड करावा. अन्यथा तालुक्यातील धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे.


फोटो:- संतोष फाले पत्रकारांशी संवाद साधताना