
मालवण : भराडी मातेवर भाजपा नेते, कार्यकर्त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मोठा जनाधार मिळाला. पहिल्यांदाच भाजपचा खासदार निवडून आला. त्याच पाठोपाठ विधानसभेत महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून आले. पदवीधर शिक्षक आणि विधानसभा निवडणुकीतही यश मिळाले. त्यामुळे विजयाची ही घोडदौड आई भराडीच्या कृपेने यापुढेही कायम राहील अशी माझी श्रद्धा आहे. असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आंगणेवाडी येथे सांगितले.
दरम्यान, भराडी मातेच्या यात्रेस खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री आशिष शेलार, भाई गिरकर, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबईतील आजी माजी नगरसेवक, आमदार उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज आंगणेवाडी येथे भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली गेली पंधरा वर्षे आंगणेवाडीत स्वागत कक्ष सुरू आहे. यापुढेही तो असाच सुरू राहणार आहे. यावर्षी या स्वागत कक्षात सर्व सामान्यांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या व्यतिरिक्त चष्मा वाटप यासह अन्य उपक्रमही राबविले जाणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी आंगणेवाडी यात्रेत भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भराडी मातेच्या आशीर्वादाने कोकणात प्रथमच भाजपचा खासदार निवडून आला. त्यानंतर शिक्षक पदवीधर मतदार संघातही यश मिळाले. विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. भराडी मातेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुख-समृद्धी दिली आहे. त्यामुळे पुढील काळात होऊ घातलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ही भाजपा युतीची विजयी घोडदौड भराडी मातेच्या आशीर्वादाने कायम राहील अशी आपली श्रद्धा आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील वीस लाख घरांना मंजुरी मिळाली आहे. यात सिंधुदुर्गातील सुमारे १२ हजार घरांचा समावेश आहे. यात योगायोग म्हणजे भराडी मातेच्या यात्रे दिवशीच म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी संबंधितांना घरकुल मंजुरीचे पत्र तसेच पहिला हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यात्रे दिवशीच प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर कार्यक्रम आयोजित करून संबंधित लाभार्थ्यांना त्यांचे मंजुरीचे पत्र दिले जाणार आहे अशी माहितीही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.