महाराष्ट्र तंत्रनिकेतन महाविद्यालयात नेत्र तपासणी शिबिर

Edited by: मनोज पवार
Published on: February 25, 2025 17:47 PM
views 140  views

मंडणगड : महाराष्ट्र तंत्रनिकेतन शेनाळचे एनएसएस विभाग आणि इन्फिगो आय केअर हॉस्पीटल तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात मोफत नेत्र तपासणी  व नेत्रदान जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. नेत्रालयाच्या वतीने व्यवस्थापक सैफ देशमुख, वैष्णवी पांचाळ, नेहा माने, तुकाराम आडुलकर आदी कर्मचारी सहभागी होते.

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून सह्याद्री तंत्रनिकेतनचे इलेक्ट्रिकल आणि टेली कॉम्युनिकेशन चे विभाग प्रमुख प्रा.मा.कबाडे आर. के. व  त्यांचे सहकारी गुरव तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अरुण ढंग हे उपस्थित होते. तसेच दूरस्थ माध्यमातून प्रणेश मोघे, नेत्रचिकित्सा अधिकारी यांनी सहभाग नोंदवला.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. प्रदीप कांबळे यांनी प्रास्ताविक करून पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य अरुण ढंग यांनी विद्यार्थ्यांना नेत्रदानाचे महत्त्व समजावून सांगताना म्हणाले कि,"नेत्रदान ही एक महत्त्वपूर्ण समाजसेवा आहे, ज्यामुळे दृष्टीहीन व्यक्तींना पुन्हा दृष्टीदान मिळू शकते.नेत्रदानामुळे एक व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर दोन किंवा अधिक व्यक्तींना दृष्टीदान देऊ शकते.नेत्रदान ही एक उदार आणि परोपकारी कृती आहे, जी समाजातील सहानुभूती आणि एकता वाढवते." 

नेत्रदानाच्या महत्त्व विशद करणारी ध्वनिचित्रफीत यु-ट्युबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. तसेच विद्यार्थ्यी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून नेत्रदानाचे डोनर प्लेजचे फॉर्म भरून घेण्यात आले. 

यावेळी विद्यार्थी सर्व प्राध्यापक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ असे ११५ जणांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व एनएसएस स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक अजय दळवी, दळवी कॅम्पस हेड विशाल नटे तसेच प्रणेश मोघे, नेत्रचिकित्सा अधिकारी याचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.