अणसूर पाल हायस्कूलमध्ये नेत्र तपासणी शिबिर

रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन - डॉ .गद्रे नेत्र रूग्णालय यांचं आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: August 27, 2024 15:35 PM
views 58  views

वेंगुर्ला : अणसूर पाल हायस्कूल अणसूर शाळेतील तसेच प्राथमिक शाळा अणसूर धरमगावडेवाडी व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी व उपचार, डोळ्यांची काळजी घेणेबाबत मार्गदर्शन शिबिर अणसूर पाल हायस्कूल अणसूर येथे शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी व लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी मोफत चष्मा वाटप सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी, डॉ गद्रे नेत्र रूग्णालय, आय केअर ऑप्टिकल सेंटर - वेंगुर्ला, महालक्ष्मी ॲग्रो प्राॅडक्ट पाल-गोडावणेवाडी, रोटरी  व इनरव्हिल क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. 

          रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या या वर्षीच्या रोटरी आय केअर - व्हिजन टू एव्हरीवन या प्रोजेक्ट अंतर्गत, नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन प्रेसिडेंट योगेश नाईक, डॉ गद्रे नेत्र रूग्णालय- आय केअर ऑप्टिकल सेंटर व रोटरी आय केअर प्रोजेक्ट संचालक उदय दाभोलकर व वैभवी दाभोलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ला रोटरी मिडटाऊनचे सेक्रेटरी ॲड.नोटरी प्रथमेश नाईक, खजिनदार मुकुल सातार्डेकर, महालक्ष्मी ॲग्रो प्राॅडक्टचे उद्योजक अंकुश गावडे, शिक्षक पतपेढी संचालक आशिष शिरोडकर, सर्विस प्रोजेक्ट चेअरमन आनंद बोवलेकर, धनेश आंदुर्लेकर,इनरव्हिल क्लब प्रेसिडेंट मंजुषा आरोलकर,पुनम बोवलेकर, सई चव्हाण,डॉ गद्रे नेत्र रुग्णालय व आय केअर ऑप्टिकल तंत्रज्ञ स्टाफ रमीता गावडे, सोनाली मुणनकर, ऐश्वर्या जाधव, शिक्षिका अक्षता पेडणेकर व चारूता परब आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी रोटरी आय केअर प्रोजेक्ट संचालक उदय दाभोलकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना डोळ्याची घ्यावयाची काळजी व सुरक्षा, मोबाईल व टिव्हीच्या सतत वापरामुळे दृष्टीवर होणारे विपरीत परिणाम व डोळ्यांचे आजार यासंदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच, रोटरी आय केअर प्रोजेक्ट अंतर्गत शालेय विद्यार्थी व पालक - ग्रामस्थ यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर वेंगुर्ला व अन्य तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी इच्छुक शाळांनी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनशी संपर्क साधावा असे आवाहन केले. प्रेसिडेंट योगेश नाईक, सेक्रेटरी ॲड.प्रथमेश नाईक व इनरव्हिल प्रेसिडेंट मंजुषा आरोलकर यांनी विद्यार्थ्यांनी या शिबिराच्या माध्यमातून, मोबाईल- टिव्हीच्या अतिवापर टाळण्यासाठी जागरूक होवून, आपल्या आयुष्यासाठी मौल्यवान असणाऱ्या डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले.

    या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ एकुण ७० विद्यार्थ्यानी व अणसूर पाल परीसरातील ५२ लोकांनी लाभ घेतला. आय केअर ऑप्टिकल वेंगुर्लाच्यावतीने, लाभार्थी पालक व ग्रामस्थांना सवलतीच्या दरात चष्मा उपलब्धता करून देण्यात आली.सदर शिबिरासाठी मोफत अल्पोपहार व्यवस्था , तसेच अणसूर पाल हायस्कूलमध्ये सध्या शिक्षण घेत असणा-या  सात लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी मोफत  चष्मा उपलब्धता  शाळेचे माजी विद्यार्थी व  उद्योजक अंकुश गावडे यांच्या सौजन्याने करण्यात आली. या शिबिरासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी  व आभार विजय ठाकर यांनी मानले.