तिलारीच्या कार्यकारी अभियंत्याकडून तब्बल 40 कोटींचा चुराडा

उ.भा.ठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांचा गौप्यस्फोट
Edited by: संदीप देसाई
Published on: February 01, 2023 19:12 PM
views 268  views

दोडामार्ग : तिलारीच्या कार्यकारी अभियंत्यांनी तब्बल 40 कोटींच्या कामांचा गैरकारभार करत ते 40 कोटी रुपये अक्षरशः पाण्यात घातल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केला आहे. तिलारी प्रकल्पाच्या आंबेली येथे सुरू असलेल्या मंजुषा पेटी बांधकामाच्या कामात हा पैशांचा चुराडा केल्याचा आरोप त्यांनी करत तेथे सुरू असलेले काम बुधवारी बंद पाडले. इतकेच नव्हे तर येत्या 8 फेब्रुवारी पर्यंतची डेडलाईन देत तिलारीचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास शिवसेना कालव्याच्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडेल, असा आक्रमक इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे.


आंबोली येथे तिलारी कालवा कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना जाब विचारताना बाबुराव धुरी, सोबत संजय गवस


नको त्या ठिकाणी कालव्यांची काम करून अधिकारी आणि ठेकेदार स्वतःची पोट भरत असल्याचा सनसनाटी आरोप श्री धुरी यांनी केला आहे. बुधवारी संबंधित कालवा विभागाचे अभियंता यांच्या समवेत तिलारी कालव्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान ज्या ठिकाणी कालवा दुरुस्तीची आवश्यकता नाही, ज्या ठिकाणी करोडो रुपयांच्या कामांची आवश्यकता नाही, अशा ठिकाणी तिलारीचे अधिकारी कामे मंजूर करून शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा करत असल्याचा घणाघात बाबुराव धुरी यांनी केला आहे.


बाबुराव धुरी यांसह शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस, उपतालुकाप्रमुख आनंद रेडकर, विभाग प्रमुख संतोष मोर्ये, मिलिंद नाईक, संदेश वरक, संदेश राणे आदींनी सुरू असलेल्या तिलारीच्या कालव्यांची सासोली व आंबेली येथे संबंधित अधिकाऱ्यासमक्ष पाहणी केली.  यावेळी कामांच्या दर्जाबाबतही आणि विशेष करून जो कोट्यावधीचा निधी थेट शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी कालवे बांधनेसाठी वापरणे आवश्यक होता, तो निधी स्वतःच्या स्वार्थापाई अधिकाऱ्यांनी चुकीच्या ठिकाणी खर्च केल्याचा आरोप धुरी यांनी केला आहे. खरे तर या 40 कोटींमध्ये गेली कित्येक वर्ष पाण्यासाठी भांडणारे उसप, पिकुळे, विर्डी, तळेखोल, आई अशा अनेक गावातील शेतकरी शेती बागायतींसाठी पाणी मागत असताना तेथील कालव्यांची काम न करता ज्या ठिकाणी कालवे बांधलेले आहेत आणि चांगले आहेत अशा ठिकाणी हे अधिकारी ठेकेदारांशी संगनमताने कोट्यावधीचा निधीची उधळपट्टी करत असल्याचा आरोप अधिकाऱ्यांसमक्ष धुरी यांनी केला आहे.


त्यामुळे तब्बल 40 कोटींचा गैरकारभार करणाऱ्या तिलारीचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांचे निलंबन करण्यात याव, चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामांची लोकायुक्त मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने धुरी यांनी केली आहे. त्यासाठी 8 फेब्रुवारीपर्यंत रोहित कोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास शिवसेना तिलारी कालव्यांच्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा बाबुराव धुरी, संजय गवस आदींनी दिला आहे.