
सावंतवाडी : सावंतवाडी नगर परिषदेच्यावतीने हरघर तिरंगा मोहिमे अंतर्गत माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.नगरपरिषदेच्या "हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या मोहीमेत ज्यांनी देशासाठी आपले सारे जीवन अर्पण केले. शत्रूच्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्या झेलल्या. तरीही, तिरंगा खाली पडू दिल्या नाहीत अशा सावंतवाडी शहरातील माजी सैनिकांचा सन्मान सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आला.
सावंतवाडी नगर परिषदेचे माजी आरोग्य व क्रीडा माजी सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते माजी सैनिक जवानांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सावंतवाडी मुख्याधिकारी सागर साळुंखे, प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे, माजी नगरसेवक आनंद नेवगीष स्वच्छता विभागाच्या रसिका नाडकर्णी, बांधकाम अभियंता शिवप्रसाद कुडपकर, दीपक म्हापसेकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्यकारणी सदस्य नरेंद्र देशपांडे आदींसह सर्व शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून "हर घर तिरंगा" ही मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. लोकांच्या हदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढवणे, ही सदर उपक्रम राबविण्यामागील मुळ कल्पना आहे. त्याअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सैनिक विष्णू ताम्हाणेकर, गजानन तेजम,पांडुरंग नाईक,उत्तम कदम, अनंत लुष्टे, विश्वनाथ बांदेकर, जगन्नाथ परब यांचा सत्कार करण्यात आला. सावंतवाडी शहरात विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात शाळांपासून होवून सांगता जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउदयान येथे झाली.
तसेच सावंतवाडी शहरात दिनांक १४ ऑगस्टला सकाळी ८.०० वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरुवात व सांगता जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउद्यान येथे होणार आहे. या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे