आचरा ग्रा.पं.चे माजी सरपंच टेमकर पिता - कन्या ठाकरे गटात

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 15, 2023 18:27 PM
views 104  views

आचरा : आचरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मंगेश उर्फ जीजा टेमकर व त्यांच्या कन्या माजी सरपंचा प्रणया टेमकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.  मागील निवडणूक नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली लढलो होतो. निवडणुकीनंतर भाजप नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांनी पाच वर्षात एकही विकासकाम आम्हाला दिले नाही. आपल्या मर्जीतील लोकांना त्यांनी कामे दिली. उलट आमदार नाईक विरोधक असताना लाखो रुपयाचा विकासनिधी गावासाठी मंजूर केला. भाजप नेत्यांच्याकार्यपद्धतीला कंटाळून आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत, असे टेमकर यांनी स्पष्ट केले. 

आचरा येथील लौकिक सभागृह येथे टेमकर यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, समीर हडकर, अविराज परब, उदय दुखंडे, नितीन वाळके, विनायक परब, दीपा शिंदे, शिल्पा खोत, विभागप्रमुख समीर लब्दे, शंकर मिराशी, मंदार ओरसकर, मंदार  केणी, भाई कासवकर, चंदन पांगे श्याम घाडी, आबा सावंत, अरुण लाड, नारायण कुबल, दीपा शिंदे यांच्यासह आचरा विभागातील शिवसैनिक, आचरा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आमदार नाईक म्हणाले, आम्ही केवळ आश्वासने देत नाही तर प्रामाणिकपणे विकासकामे करतो. किनारपट्टीवरील सर्व ग्रामपंचायतींवर जनतेने भगवा फडकवल्याने एका वर्षात पन्नास लाखाहून अधिकचा विकासनिधी दिला. आचरा शिवसेनेचा बालेकिल्ला असून टेमकर यांच्या रूपाने ग्रामपंचायतीवर भगवा फडकवूया. आता खोटी आश्वासने देणाऱ्यांचा पर्दाफाश करून गावच्या विकासासाठी शिवसेनेला साथ द्या. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मोदी जॅकेट घालून मिरवणाऱ्या नेत्यांची छाती फोडूया.

 टेमकर यांच्या प्रवेशाने अर्धी लढाई जिंकलो : 

टेमकर यांनी सरपंच पद भूषवताना जनतेशी संपर्क ठेवला आहे. टेमकर या निवडणुकीत विजयी होऊन सरपंच पदाची हॅट्रिक साधतील. आश्वासने देणाऱ्यांना थारा न देता विकास करण्यासाठी योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी राहा. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना हा सक्षम पर्याय आहे. त्यामुळे टेमकर यांच्या प्रवेशाने अर्धी लढाई जिंकलो असून १३ सदस्यही एकहाती शिवसेनेचेच निवडून आले पाहिजेत, असे पारकर म्हणाले. यावेळी पदाधिकारी, शिवसैनिक यांचीही भाषणे झाली.