
कुडाळ : राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फुट अटळ मानली जाते.पक्षविरोधी भुमिका घेतल्याने प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष एम.डी.सावंत यांच्या सह ९ जणांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.
यामध्ये प्रांतिक सदस्य सावळाराम अणावकर,उदय भोसले, कणकवली विधानसभा अध्यक्ष अभिनंदन मालडकर, जिल्हा उपाध्यक्ष एम,डी,सावंत जिल्हा सरचिटणीस सुधाकर कर्ले, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष हार्दिक शिगले यांचा समावेश आहे. हकालपट्टी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी कृती केल्याने सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरून व पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.यापुढे पदावरून व पक्षातून हकालपट्टी केलेल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा वापर कुठेही करू नये असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोण कोण अजित पवार यांच्यासोबत जातात हे आता औत्सुक्याच ठरणार आहे.