
सिंधुदुर्गनगरी : ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय व प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये "स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष" स्थापन करण्यात आले असून आपल्या मदतीसाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी याचा वापर करावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी उपाय व सुविधा पुरविणे, राज्यघटनादत्त वृध्दांचे हक्क अबाधित ठेवणे. वृध्दांची आर्थिक सुरक्षितता, आरोग्य, पोषण मुल्य, निवारा, शिक्षण, कल्याणकारी जीवन जगता यावे, यास्तव त्यांच्या जीवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे, ज्येष्ठ नागरिकांचा विविध स्तरातून होणारा छळ, पिळवणूक यापासून त्यांचे संरक्षण करणे, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक / मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, त्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी तसेच त्यांच्या अडीअडचणी/समस्याची तात्काळ दखल घेवून त्याचे वेळीच निवारण व्हावे, याकरीता जेष्ठ नागरिकांसाठी जिल्हा पोलीस विभागाकडून पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग येथील पोलीस नियंत्रण कक्ष येथे दि.०८/०२/२०२५ पासून हेल्पलाईन नं. ७०३६६०६०६० ची सेवा सुरु करण्यात आलेली असून सदर कक्षाची आदर्श संहिता (कार्यप्रणाली) सर्व संबंधित प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग येथील भरोसा सेल येथे व पोलीस ठाणे स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. सदर कक्षाचे कामकाज हे २४ तास सुरु रहाणार असून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांची व तक्रारीची त्वरीत दखल घेवून त्याचे निरसन करण्यात येणार आहे. तसेच पोलीस विभागाशी संबंधित नसलेल्या तक्रारी हया संबंधित विभागास पाठविल्या जाणार आहेत.
याशिवाय ज्येष्ठ नागरीकांच्या अडीअडचणी/समस्याचे निवारण करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात दरमहा दुस-या शनिवारी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. सदर बैठकीला इतर विभागातील अधिकारी यांना तसेच नवीन कायदे व सायबर जनजागृती करण्यासाठी तज्ञ व्यक्तीना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच महिन्यातून एकादा कोणत्याही एका पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी सिंधुदुर्ग पोलीस हेल्पलाईनचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी त्यांचे जवळपासचे पोलीस ठाण्यात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्हयातील सर्व जेष्ठ नागरीकांना केले आहे.