
सिंधुदुर्गनगरी : सुप्रशासनासाठी अष्टप्रधान मंडळासारखी अभूतपूर्व मुलकी प्रशासकीय व्यवस्था निर्माण करणाऱ्या छ. शिवाजी महाराजांनी समुद्री सत्तेचे महत्व ओळखून मराठी आरमाराची अत्यंत विचारपूर्वक स्थापना केली. स्वतंत्र आरमार निर्माण करणारे शिवराय हे भारतातील पहिले राजे होते. त्यांचे हे काम अफाट आणि दूरदृष्टीचे आहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी केले.
सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात 'भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेजचे प्राचार्य धोपेश्वरकर होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. पाटील यांनी श्री. लळीत व प्रा. धोपेश्वरकर यांचे स्वागत व सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलनांतर छ. शिवरायांच्या आणि धन्वंतरीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.
छ. शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करताना त्यांच्या मनात असलेले सुराज्य आणि रयतेचे राज्य प्रत्यक्षात आणण्यासाठी जी पावले उचलली, ज्या व्यवस्था निर्माण केल्या, त्याचा सविस्तर आढावा श्री. लळीत यांनी घेतला. ते म्हणाले, छ. शिवाजी महाराज यांनी स्वत:च्या उपभोगासाठी राज्य स्थापन केले नाही. 'हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा!' या भावनेने त्यांनी स्वराज्य उभे केले आणि 'उपभोगशून्य स्वामी' म्हणून कारभार केला. या अर्थाने त्यांचे काम 'लोकोत्तर' आहे. पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन व्यवस्था म्हणजे अष्टप्रधान मंडळाची स्थापना त्यांनी केली. राज्यकारभाराविषयक सुसुत्र नियमावली म्हणजे 'कानुजाबता' तयार करवून घेतला. नागरी प्रशासन आणि लष्कर स्वतंत्र राहील, याची दक्षता घेतली. पण नागरी किंवा मुलकी प्रशासन हेच सर्वोच्च राहील, अशी व्यवस्था केली. आजही हीच व्यवस्था आपल्या देशात राबवली जाते. मध्ययुगात मुलकी सत्तेचे श्रेष्ठत्व सांगणारा हा थोर नेता भारताच्या इतिहासातही कदाचित एकमेव असेल.
यावेळी सतीश लळीत यांनी सांगितले की, राज्याभिषेक शक सुरु करणे, शिवराई आणि होन ही नाणी पाडून स्वत:चे चलन निर्माण करणे, उत्तम प्रशासकीय व्यवस्था आणि सैन्याबरोबरच कार्यक्षम हेरखाते सुरु करणे, मुद्रा तयार करणे, राजव्यवहार कोश तयार करणे, वतनदारांचे अधिकार मर्यादित करणे, धर्मनिरपेक्ष कारभार करणे अशी कितीतरी लोकोत्तर कामे शिवरायांनी केली. मात्र स्वतंत्र आरमाराची स्थापना करुन स्वराज्याच्या सागरी सीमा सुरक्षित करणे, अनेक जलदुर्ग आणि सागरी दुर्गांची साखळी उभी करणे, हे त्यांचे कार्य अतुलनीय आहे. आज भारताचे नौदल जगातील सर्वात बलाढ्य नौदलांपैकी एक आहे, त्याचे कारण शिवरायांचा नौदल व आरमाराविषयीचा दृष्टिकोन आधुनिक भारताने स्वीकारला. छत्रपती शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत एक अत्यंत महत्वाचे कार्य केले ते म्हणजे एक बलाढ्य आरमार उभे करून भारताचा समुद्र किनारा सुरक्षित केला.
अध्यक्षपदावरुन बोलताना प्रा. धोपेश्वरकर यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना कलाविषयक मार्गदर्शन केले. वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रस्पर्धेचे पारितोषिक वितरण त्यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय दळवी, विद्यार्थी संघ कार्याध्यक्ष डॉ. साईनाथ सितावार, डॉ. विनोद काठाने, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ. मुग्धा ठाकरे, डॉ. शितल पाटील, डॉ. राजेंद्र पाटील
विद्यार्थी सांस्कृतिक प्रतिनिधी जयराज मरकड, शुभांगी खैरे, सूत्रसंचालन करणाऱ्या विद्यार्थिनी - आकांक्षा फुके, शिवाई भांडे, जनरल सेक्रेटरी शिवानी सिंह, डॉ. सई लळीत व अन्य मान्यवर उपस्थित होते.