प्रत्येक गावात गॅस कनेक्शन ई - केवायसी केंद्र काढा

ठाकरे सेनेची मागणी
Edited by:
Published on: January 05, 2024 19:32 PM
views 436  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरासह तालुक्यासाठी कार्यरत असलेल्या वेंगुर्ला गॅस एजन्सी मार्फत सध्या गॅस ग्राहकांची गॅस कनेक्शनबाबत ई-केवायसी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही ग्राहकांच्या मोबाईलवर ई-केवायसी करण्याचे मॅसेज टाकून दोन दिवसात ई-केवायसी करण्याची तारीख दिली जाते. अकस्मिक आलेल्या व दोन दिवसांच्या मुदतीमुळे बाहेर गावी कामानिमित्त गेलेल्या किवा आजारपणाच्या उपचारासाठी गेलेल्या गॅस ग्राहकांना अडचण निर्माण होते. या संदर्भात आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे तक्रारी आलेल्या आहेत. दरम्यान, ई-केवायसी संदर्भात तालुक्यातील प्रत्येक गावात ई-केवायसी ठिकाण निर्माण करून १५ दिवसांची मुदत मिळावी अशी मागणी वेंगुर्ला उबाठातर्फे करण्यात आली आहे.

उबाठाचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या नेतृत्वाखाली  प्रकाश गडेकर, अजित राऊळ, उमेश नाईक, निलेश चमणकर, नित्यानंद शेणई, महादेव काजरेकर, गजा गोलतकर, अभि मांजरेकर, संदिप पेडणेकर व वाल्मिकी कुबल यांनी वेंगुर्ला तहसिलदार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

गॅस ग्राहकांकडे याबाबत केलेल्या चौकशीत वेंगुर्ला गॅस सव्र्हसने पेट्रोलियम मंत्रालय भारत सरकारच्या निर्देशानुसार देशातील प्रत्येक गॅस ग्राहाकाला ई-केवायसी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार वेंगुर्ला तालुक्यातील तिसही गावात वेंगुर्ला गॅस सव्र्हस एजन्सीच्या २३ हजार  ग्राहकांची ई-केवायसी केली जाणार आहे. परंतु, एकाच ठिकाणी या ग्राहकांची ई-केवायसी होणार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन दूरवरील ग्राहकांना शारीरिक व मानसिक त्रास, आर्थिक भुर्दंड होणार असून तसेच भांडणासारखे प्रकार झाल्यास शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे.

हे सर्व टाळण्यासाठी गॅस एजन्सीमार्फत तीस ठिकाणी ई-केवायसी केंद्र निर्माण केले जावे, ई-केवायसीसाठी लागणारी कागदपत्रे यांची माहिती दिली जावी व ई-केवायसी करण्याची मुदत १५ दिवसांची करण्यात यावी. तसेच तालुक्याचे अधिकारी या नात्याने या संदर्भात वेंगुर्ला गॅस सव्र्हसच्या संचालक किवा व्यवस्थापकांना बोलावून माहिती देऊन आपल्या मार्फत ती माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी, जेणेकरून गॅस ग्राहकांचे नुकसान टाळले जाई असे निवेदनामध्ये नमूद केले आहे.