
रत्नागिरी : राज्याच्या विविध भागात मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा करत गुढीपाडवा साजरा केला जातो. जिल्ह्यातल्या लांजामध्ये गुढीपाडव्याच्या आदल्या रात्रीपासून देवाच्या नावाचा जयघोष करत, पारंपरिक गाणी म्हणत रात्रभर जागर करत मराठी नवीन वर्षाचे स्वागत केलं जातं. गावातील पाचाचा मांड या ठिकाणी सर्वधर्मीय आणि लहान थोर एकत्र येतात आणि पारंपरिक पद्धतीची गाणी म्हणत जागर करतात. याला स्थानिक भाषेत घोरीप असे म्हणतात. घोडा नाचवणे आणि हत्तीचे रूप हा यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.
हिंदू नवीन वर्षाचे स्वागत करत असताना देवाच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे याच उद्देशाने घोरीप हा प्रकार साजरा केला जात असावा, असं बुजुर्गांचं म्हणणं आहे. शेकडो वर्षांची ही परंपरा, स्थानिक बोली भाषेतील जुनी गाणी, त्यातून केलं जात असलेले समाज प्रबोधन, विविध विषयांची महती असा हा सोहळा परंपरा जपणारा असतो. मराठी नवीन वर्षाचे स्वागत करत असताना अशा पद्धतीने रात्रभर होणारा जागर हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकार असावा.
मुख्य गोष्ट म्हणजे याच घोरीपनंतर गावात गुढ्या उभारण्यास सुरुवात होते. शेकडो वर्षांची परंपरा आजही तितक्याच आपुलकीने आणि पारंपरिकता जपत साजरी केली जाते. त्यामुळे याला एक वेगळं महत्त्व आहे. रात्री सुरू झालेला जागर अगदी पहाटेपर्यंत सुरू असतो.