
सावंतवाडी : वर्षा पर्यटनासाठी विकेंडला आंबोलीत पर्यटकांची होणारी गर्दी आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता धबधब्याच्या परिसरातील किमान ५ किलोमिटरचा रस्ता वाहतुक कोंडी विरहीत राहण्याठी आपल्या स्तरावर प्रयत्न करा. जेणेकरुन अत्यावश्यकवेळी वाहतुकीला अडथळा होऊ नये, अशी मागणी आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह शिष्ठमंडळाने पोलिस निरिक्षक राजेंद्र मगदूम यांच्याजवळ केली.
यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सिताराम गावडे, अभय पंडीत, सुंदर गावडे, बावतीस फर्नांडिस, गौरव जाधव, संतोष तळवणेकर, शिवा गावडे, श्री. नाईक आदी उपस्थित होते. श्री. साळगावकर यांनी आज पोलीस निरीक्षक श्री. मगदूम यांची भेट घेतली. यावेळी विशेष करून आंबोलीतील वाहतूक कोंडी संदर्भात आणि त्या ठिकाणी होणाऱ्या अपघाताबाबत सविस्तर चर्चा करत उपाययोजनांची मागणी केली.
श्री. साळगावकर यांच्या मागणीनुसार आंबोलीमध्ये शनिवार-रविवार दोन दिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी उद्भवते. येथे येणारे पर्यटक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा परिस्थितीत पार्किंग करतात. त्यामुळे अत्यावश्यक परिस्थितीमध्ये एखाद्या रुग्णाला बेळगाव केएलई सारख्या ठिकाणी जायचे असल्यास मोठी समस्या निर्माण होते. त्याला वेळीच उपचार मिळू शकत नाहीत. त्यामुळे किमान धबधबा परिसरातील पाच किलोमीटरचा रस्ता शनिवार रविवार या दोन दिवसांमध्ये वाहतूक कोंडी विरहित राहावा यासाठी वेगळी उपाय योजना राबवा, अशी मागणी केली.
आंबोली येथे दोन दिवसांपूर्वी धबधब्याच्या ठिकाणी सर्पदोष झाल्याने एका पर्यटकाला वाहतूक कोंडीचा फटका बसून वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. यावरही साळगावकर यांनी बोट ठेवले. मात्र, संबंधित पर्यटकांचा मृत्यू वाहतूक कोंडीमुळे झाला नसल्याचे स्पष्टीकरण पोलीस निरीक्षक श्री. मगदूम यांनी दिले. त्या पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्सला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही असेही ते म्हणाले. आंबोलीत येणारे पर्यटक हे अति उत्साही तसेच मद्यधुंद असतात. त्यांना आवर घालणे पोलिसांनाही शक्य नाही. एखाद्यावेळी त्यांच्यावर कारवाईचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केल्यास चुकीच्या पद्धतीचा व्हिडिओ शूटिंग करून ते प्रसारित केले जाते. जेणेकरून त्यामध्ये पोलिसांची बदनामी होते. त्यामुळे अशा पर्यटकांना आवरणे खूप कठीण बनते.
दुसरीकडे, सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तब्बल 30 पेक्षा जास्त कर्मचारी अपुरे आहेत. मागच्या काही वर्षाचा विचार करता वर्षा पर्यटनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून तब्बल 100 पोलीस कर्मचाऱ्यांचे बळ अतिरिक्त दिले जात. परंतु, सद्यस्थितीत अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बळावर आंबोली वर्षा पर्यटनाची सुरक्षितता सांभाळावी लागत आहे.
श्री. साळगावकर म्हणाले, दोन दिवस वाहतूकीला अडथळा ठरणारी अवजड वाहने रोखण्यात यावी असेही सूचित केले. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन वाहतूक पार्किंग बाबत निर्णय घेतल्यास यावर मार्ग निघू शकतो असे सांगितले. यावेळी संबंधित ग्रामपंचायतीकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याची नाराजी मगदूम यांनी बोलून दाखवली. वनविभागाचे कर्मचारी सुद्धा फक्त धबधब्याच्या परिसरामध्येच तैनात असतात असे ते म्हणाले. त्यामुळे संपूर्ण आंबोली तसेच चौकुळ आणि गेळ्याच्या पर्यटनावर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवून काळजी घेतली जाते. तरीसुद्धा वाहतूक कोंडीबाबत आपण सुचवलेल्या सूचनांनुसार योग्य ते नियोजन करून जास्तीत जास्त वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू असे श्री. मगदूम म्हणाले.
यावेळी जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, माजी नगरसेवक विलास जाधव यांनीही काही सूचना केल्या. सावंतवाडी शहरातील वाहतूक कोंडी संदर्भातही पोलीस निरीक्षक श्री. मगदूम यांचे लक्ष वेधण्यात आले. शहरातील वाहतूक कोंडी संदर्भात पालिका प्रशासनाकडून नियमावली आखण्यात येत आहे. हे नियमावली पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यानुसार शहरातील वाहतूक कोंडीवर काम करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.










