
दोडामार्ग : कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील साटेली भेडशी येथील ग्रामस्थांचे रस्त्यावरील अतिक्रमण खुले करण्यासाठी तेथील माजी सरपंच नामदेव धरणे व ग्रामस्थांनी सुरू केलेला साखळी उपोषण सोमवारी अकराव्या दिवशी सुरूच असून प्रशासनाकडून ठोस निर्णय घेण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे आता पाळीव जनावरे यांचे हाल होत असल्याने ती जनावरे ग्रामपंचायत कार्यालय आवारात बांधण्याचा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साटेली भेडशी ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग चार मधिल अतिक्रमण बाजूला केले होते. असे असताना पुन्हा आदेशाची पायमल्ली करुन पुन्हा बांधकाम केले त्यामुळे अनेक घराकडे जाणारा रस्ता वाट काहींनी बंद केली आहे. ती खुली करावी यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या मतदार संघातील साटेली भेडशी गावातील ग्रामस्थ गेले अकरा दिवस साखळी उपोषण करत न्याय माघत असताना प्रशासन यंत्रणा ठोस निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहेत. रस्ता बंद झाल्याने गुरांना गोठ्यात नेणे सुद्धा काही ग्रामस्थांना शक्य नाही, त्यामुळे आता पाळीव जनावरे ग्रामपंचायत कार्यालय आवारात बांधण्याचा इशारा उपोषण कर्ते यांनी दिला आहे.