
कुडाळ : जिल्ह्यातील १ हजार ५३९ अंगणवाड्या बंद ठेवत जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी व अंगणवाडी मदतनीस यांनी बेमुदत संप पुकारला आहे. जिल्ह्यात १००% अंगणवाड्या बंद ठेवत संप करण्यात आला आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा बेमुदत संप सुरू ठेवणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी दिली. ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत असल्याने त्या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करणार आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचारी मदतनीस आंदोलन करतील असे त्यांनी सांगितले
राज्य शासनाला या आधी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि सर्वोच्च न्यायालया ने अंगणवाडी कर्मचारी यांच्या ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा इत्यादी सर्व लाभ द्या.आशांच्या मानधनात जाहीर झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ताबडतोब भरीव मानधनवाढ जाहीर करा. मदतनीस व सेविकांचे मानधन किमान १८ हजार ते २६ हजारापर्यंत करा . सेविका व मदतनिस यांच्या मानधनात १०० ला ७५ असे प्रमाण करा. मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करा. महिला व बालविकास मंत्र्यांशी चर्चा झाल्यानुसार विना योगदान मासिक निर्वाह भत्ता (पेन्शन) सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव मंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे नोव्हेंबर अखेरपर्यत तयार करून तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करवून घ्या. महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथील करून अंगणवाड्यांसाठी रु ५००० ते ८००० भाडे मंजूर करा.
आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये असा करा.अंगणवाडी कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करावी या सह अन्य मागण्या च्या पूर्तेतेसाठी अंगणवाडी कृती समितीने राज्य शासनाला निवेदन दिले होते मात्र, राज्य शासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने राज्यव्यापी आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच मासिक अहवाल व ऑन लाईन कामावर बहिष्कार टाकत चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र राज्य सरकार ने दखल न घेतल्याने सोमवारी 4 डिसेंबर पासून राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे दोन हजाराहून अधिक अंगणवाडी कर्मचारी व पाचशेहून अधिक मदतनीस या संपात सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, आयटक, अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ, म.रा.पु.प्रा. सेविका, मदतनीस महासंघ, कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन या सर्व संघटना या अंगणवाडी बंद संपासाठी एकवटल्या असून नवीन भरती झालेल्या कर्मचारी यांनीही या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.