
कोल्हापूर पुढे कोणतं शक्तीपीठ ? : संपत देसाई
सावंतवाडी : तुमचा विकास छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणा विरोधात असेल तर तो आम्हाला मान्य नाही.२२ वर्ष तुम्हाला मुंबई-गोवा महामार्ग करता आला नाही. कोकणच्या दृष्टीने शक्तीपीठ महामार्ग हे संकट आहे. इथले जंगली प्राणी नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणार नाहीत. ते आपल्याच घरादारात येणार आहेत. त्यामुळे आजच विचार केला पाहिजे. जंगल उद्ध्वस्त होऊ देता नये असं आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले. सावंतवाडी येथील शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.
सावंतवाडी येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने बैठकीच आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'एकच जिद्द शक्तीपीठ रद्द' असा नारा देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, कॉ संपत देसाई, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, प्रसाद पावसकर, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.
श्री. फोंडे पुढे म्हणाले, शक्तीपीठमध्ये सरकार चर्चा करायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस काही गोष्टी लपवत आहेत. आम्ही विकास विरोधी नाही. रत्नागिरी-नागपूर महामार्ग होताना आम्ही कधी विरोध केला का ? त्यामुळे आता आणखीन पर्यायी शक्तीपीठ हवा तरी कशाला ? असा सवाल केला. तसेच रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून किती प्रवासी येतात हे देखील बघितले पाहिजे. शक्तीपीठ का हवा ? याच कारण अद्याप सरकार देऊ शकले नाहीत. तसेच अजूनही या साठीचा मोबदला जाहीर केलेला नाही. चांगला मोबदला देऊ असं सरकार म्हणत आहे. सह्याद्री पट्टयातून हा महामार्ग खनिज संपत्ती वाहून नेण्यासाठी आहे अस विधान त्यांनी केले.
धमक्यांना घाबरत नाही : कॉ. संपत देसाई
दरम्यान, निसर्ग, पर्यावरण, कोकणावर प्रेम असणाऱ्यांनी शक्तीपीठला विरोध केला पाहिजे. हा धोका फक्त १२ गावांना नाही. याचे दिर्घकालीन परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत अस मत कॉ संपत देसाई यांनी व्यक्त केले.जे विरोध करतील त्यांना फटके द्यायचा इशारा इथले नेते देत आहेत. जैतापूर वेळी आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरलो नाही, आताही घाबरणार नाही. आमचा आवाज दडपला जाणार नाही. जनता जागी होते तेव्हा काय होतं ते तुम्हाला दिसेल असंही श्री. देसाई म्हणाले. सत्तेच्या जीवावर लोकांना दडपण शक्य होणार नाही. कोल्हापूर पुढे रस्ता नेत कोणत शक्तीपीठ दर्शन यांना करायचं आहे ? तिथे कोणतं शक्तीपीठ आहे ? भावनिक नाव देण्याचा हा प्रयत्न आहे. पर्यावरणाला धोका निर्माण करणारा शक्तीपीठ आवश्यक नाही असं मत व्यक्त केले.
विकास करणारे पक्ष बदलणार, गाव भकास होणार !
डॉ. परूळेकर म्हणाले, सिंधुदुर्ग सारखा निसर्ग तयार व्हायला अडीच हजार वर्ष लागतात. त्यामुळे हे होऊ देता नये. आपल्याला आपल्या निसर्गाची किंमत नाही. इतर देशांत ती जपली जाते. जीडीपी वाढवायला ताजमहाल खोदणार का ? त्या खाली असलेल्या गोष्टीन जीडीपी वाढेल. जग आपल्याला मुर्खात काढेल असं मत सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले. काही लोक सांगतातयत ३० किमीचा बोगदा आहे असं सांगत आहेत. हे कदापि होऊ शकत नाही. जनतेला फसवण्याच काम होत आहे. झाड कापली जाणार हे सांगितले जात नाही. झाड कापली जाणार हे सांगायला का घाबरता ? असा सवाल केला. झालेली कत्तल भरून निघणारी नाही. त्यामुळे गावागावात चला, जनजागृती करा असं आवाहन केलं. विकासाच्या नावावर बोलणारी लोक पक्ष बदलून मोकळी होणार, आपलं गाव भकास होणार आहे.
यावेळी डॉ. लळीत म्हणाले, राज्य सरकारला भसम्या रोग झालेला आहे. त्यांच पोट कधीही भरणार नाही. विकासाला आमचा विरोध नाही. पण, पर्यावरणाचा समतोल राखून तो झाला पाहिजे असं मत निसर्ग अभ्यासक डॉ. सतिश लळीत यांनी व्यक्त केले. नागपूर ते रत्नागिरी पर्यायी महामार्ग उपलब्ध असताना वेगळ्या मार्गाची आवश्यकता नाही. तो का लादला जात आहे ? हा आमचा सवाल आहे. घाट रस्त्यांवर पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे. तर १२ जिल्ह्यात शक्तीपीठ कोणी मागितलेला का ? ८६ हजार कोटी खर्च दीड-दोन लाख कोटींवर जाणार आहे. कंत्राट दारांचे पैसै द्यायला यांना जमत नाही. न मागितलेला रस्ता यांना करायचा आहे. उद्योगपतीच्या फायद्यासाठी रस्ते करायचे हे चालणार नाही. असं मत कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी व्यक्त केले. हा महामार्ग जबरदस्तीने लादला जात आहे. संकेश्वर-बांदाच पुढे काय झालं ? मुंबई- गोवा महामार्गाच काय झालं ? या रस्त्यांची परिस्थिती आदी बघा, ते व्यवस्थित करा असं श्री. शेख म्हणाले. १२ गावात सत्ताधारी पक्षाचे सरपंच आहेत. त्यामुळे लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांना आमिष दाखवत आहेत असाही आरोप श्री. शेख यांनी केला. उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. धुरी म्हणाले, हे पाप लक्षात घेतलं पाहिजे. आंदोलन केलं म्हणून निलंबित केलेला शिक्षक आहे. माझं डोकं फुटलं तरी चालेल पण शक्ती पिठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा बाबुराव धुरी यांनी दिला.अण्णा केसरकर म्हणाले, शेतकरी संघटना तुमच्या सोबत आहे. आमच्यामागे इडी लावू शकत नाही. तसे कोणी व्यासपीठावर उपस्थित नाही. त्यामुळे वेळ पडली तर जेलभरो आंदोलन करू असा इशारा केसरकर यांनी दिला. यावेळी डॉ. सतीश लळीत, अरविंद मोंडकर, समीर वंजारी, संजय लाड, महेंद्र सांगेलकर, अँड. राघवेंद्र नार्वेकर, मायकल डिसोझा, विभावरी सुकी, प्रा. बाळासाहेब नंदीहळ्ळी आदींसह बाधित गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छ.शिवरायांच्या ठेव्याला धोका !
आम्हाला कोणतीही कल्पना न देता सर्व्हे केला गेला. आम्हा शेतकऱ्यांचा याला पूर्ण विरोध आहे. हनुमंत गडाच द्वार यात जाणार आहे. गडाचा काही भाग बाधित होत आहे.शिवछत्रपतींचा ऐतिहासिक ठेवा नष्ट होणार असेल तर शक्तीपीठ महामार्ग हवा कशा? असा सवाल येथील शेतकरी शंभू आईर यांनी या बैठकीत केला.