हत्तींचा मोर्चा तळकट पंचक्रोशीकडे

Edited by: विनायक गांवस
Published on: June 06, 2025 20:16 PM
views 219  views

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यातील हत्तींनी त्यांचा मोर्चा तळकट पंचक्रोशीकडे वळविला आहे. हत्तींनी सध्या तेथेच ठाण मांडल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या हत्तींना पिटाळून लावण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

दोडामार्ग तालुक्यात गेल्या तेवीस वर्षांपासून हत्तींचा उपद्रव सुरूच आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचे सध्या चित्र बनले आहे. तालुक्यात एकूण सहा हत्तींचा वावर असून त्यांचे दोन कळक वेगवेगळ्या ठिकाणी वावरत आहे. ओंकार टस्कर, मादी व दोन पिल्ले यांचा मागील काही दिवसांपासून तळकट पंचक्रोशीत वावर सुरू आहे. या हत्तींनी तेथे उच्छाद मांडला आहे. गणेश व लहान मादी यांचा कळप केर, मोर्ले परिसरात वावरत होता. 

सध्या या दोन हत्तींनी त्यांचा मोर्चा तळकट पंचक्रोशीत कडे वळविला आहे. कोलझर, तळकट ही पंचक्रोशी सुपारी, माड  बागायातींची गावे म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. शिवाय येथे पाण्याचा साठाही मुबलक आहे. त्यामुळे एक कळप तेथे उच्छाद मांडत असताना दुसऱ्या कळपातील हत्तींनी तेथे बस्तान मांडल्यास तेथील शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन्ही कळपातील सहा हत्तींनी तेथे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या हत्तींचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी तेथील शेतकरी व ग्रामस्थ करीत आहेत.