
दोडामार्ग : बांबर्डे परिसरात दाखल झालेल्या हत्तींनी उच्छाद मांडला आहे. येथील शेतकऱ्यांच्या केळी, सुपारी व नारळ बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून वनविभागाने हत्तींच्या तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
बांबर्डे - घाटीवडे परिसरात टस्कर व पिल्लू पाच दिवसांपूर्वी दाखल झाले. या हत्तींनी तेथील शेतकऱ्यांच्या फळबागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. रविवारी रात्री हे बांबर्डे येथील शेतकरी सत्यवान गवस यांच्या फळबागायती घुसले. त्यानंतर केळी, सुपारी पिकांचे मोठे नुकसान केले. हे हत्ती दररोज येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करत असल्याने आम्ही जगावे तरी कसे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. हत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून टस्कर हत्तीमुळे जीवितालाही धोका निर्माण झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. या हत्तींना वनविभागाने पिटाळून लावण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.










