
सावंतवाडी : आंबोली जकातवाडी येथे शनिवारी भात शेतीमध्ये जंगली हत्ती आढळून आला. आंबोली जकातवाडी व गावठाणवाडी दरम्याने हिरण्यकेशी नदीपात्रामध्ये असलेल्या भात शेतीमध्ये हा हत्ती भात शेतातील भात खात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. तात्काळ याबाबतची खबर आंबोली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर आंबोली वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले व या हत्तीला त्या ठिकाणाहून हुसकावण्यासाठी फटाके व टॉर्चच्या माध्यमातून प्रयत्न करत होते. परंतु, हा हत्ती रात्री उशिरापर्यंत या ठिकाणाहून गेला नव्हता.
रात्री बारानंतर हा हत्ती हिरण्यकेशीच्या डोंगराजवळ गेला असल्याचे ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. हत्ती साधारणपणे दहा ते बारा वर्षाचा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून हा हत्ती तिलारी चंदगड येथून या ठिकाणी आला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. यापूर्वीसुद्धा आंबोलीमध्ये अशाप्रकारे हत्ती येऊन ऊस शेती व इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या घटना दरवर्षी घडत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला योग्य त्या उपाययोजना करून हत्तींवर नियंत्रण ठेवण्याबाबत विनंती केली आहे. यापूर्वी आलेल्या हत्तींनी जरी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले नसले तरीही कोणतीही जीवित हानी अथवा मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून वनविभागाने काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. याबाबत वनविभाग कार्यरत असून योग्य त्या उपाययोजना करणार असल्याचे आंबोली वन विभागाचे वनक्षेत्रपाल यांनी सांगितले.