सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 25, 2023 19:01 PM
views 294  views

सिंधुदुर्ग : सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा अस आवाहन महावितरणनं केलं आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगी, पोलीस स्थानक परवाना, विद्युत निरिक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.

गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचे वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखावे इ. ची उभारणी करताना लघुदाब-उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून करून घेण्यात यावी. गणेश मंडळांनी भाविक भक्तांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. आपात्कालीन स्थितीकरीता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे टोल फ्री क्रमांक 1912 /19120/ 1800-212-3435 / 1800-233-3435 हे ग्राहकांच्या सेवेत 24 तास उपलब्ध आहेत अशी माहिती किशोर खोबरे, जनसंपर्क अधिकारी (प्र.) कोकण परिमंडळ यांनी दिली आहे.