इन्सुलीत तीन दिवस वीज पुरवठा गायब...!

Edited by: विनायक गांवस
Published on: May 25, 2024 08:41 AM
views 139  views

सावंतवाडी : महावितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे इन्सुली गावात गेले तीन दिवस वीज पुरवठा गायब आहे. महावितरणचे सब स्टेशन इन्सुली गावात असून सुद्धा इन्सुली वासीयांना काळोखात रहावे लागत असेल तर इतर गावांचा वीजपुरवठा कसा सुरळीत करणार असा सवाल उपस्थित होत आहे. तर याबाबतचा जाब वीज वितरणला विचारणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सहाय्यक अभियंता अनिल यादव यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

 वादळी वाऱ्यामुळे इन्सुली गावात बुधवारपासून वीजपुरवठा बंद आहे. बुधवारी रात्र ते शुक्रवारी रात्री पर्यंत काही भाग वगळता वीजपुरवठा बंद होता. येथील सहाय्यक अभियंता यांचा मोबाइल गेले दोन दिवस बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नाही. केवळ मेन लाईन बंद असल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इन्सुली गावात महावितरणचे सबस्टेशन असून  संबंधित विभाग त्या गावाचा वीजपुरवठा सुरळीत करू शकत नाही तर इतर गावाला काय वीज देणार असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने गावातील वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे. मात्र याबाबत इन्सुली ग्रामस्थ लवकरच संबंधित विभागाला जाब विचारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.