
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने महावितरणच्या अंधाधुंद कारभाराला कंटाळलेल्या जिल्ह्यातील वीज ग्राहक, व्यापारी, सरपंच संघटनेला आपल्या समस्या महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्यासमोर मांडण्यासाठी कुडाळ येथे बैठकीस येण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील वीज ग्राहक, व्यापारी आणि सरपंच संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वीज ग्राहक कुडाळ येथे दाखल झाल्याने अधीक्षक अभियंता कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील प्रशिक्षण हॉलमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या अनेक वीज ग्राहकांनी तालुकावार आपापल्या समस्या अधीक्षक अभियंता यांच्या समोर मांडून तात्काळ लेखी उत्तर देण्याची मागणी केली. जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा रोष पाहता महावितरणचे अधिकारी निरुत्तर झाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक ॲड नंदन वेंगुर्लेकर, राजेश राजाध्यक्ष, ह्युमन राईट्स कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सुनील भोगटे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, सचिव जयराम वायंगणकर, कणकवली तालुकाध्यक्ष गुरुनाथ तथा दादा कुलकर्णी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, कुडाळ गोविंद सावंत, माजी पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगरी भाग असून जिल्हाभरातील महावितरणच्या मुख्य वाहिन्या या डोंगरातून जात असल्याने पावसाळ्यात झाडे पडून अनेकदा वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात. याकरिताच सिंधुदुर्ग महावितरणला रत्नागिरी येथील मुख्य कार्यालयातून पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुख्यत्वे करावयाची ३३ कामे प्राधान्याने करून घेण्याचे सूचित केले होते. यामध्ये लाईनला लागणारी झाडे छाटणी, गंजलेले वीज खांब, वाहिन्या बदलणे, रोहित्रांमधील ऑइल लेव्हल तपासणे अशा कामांची यादी दिली गेली होती. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणने प्रत्यक्षात कामे न करता केवळ कागदावरच कामे केल्याचे दाखवून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना खंडित विजेच्या समस्येला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आज याच मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली असता यावेळी पावसाळा लवकर सुरू झाल्याने महावितरण कामे करून घेण्यात कमी पडल्याची कबुली देत, उघडीप मिळताच झाडांची छाटणी करून घेतली जाईल अशी ग्वाही देऊन नूतन अधीक्षक अभियंता राख यांनी पुढच्यावेळी अशाप्रकारची दिरंगाई होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वीज ग्राहक संघटना व महावितरणचे अधिकारी यांच्यातील चर्चा खेळीमेळीत झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आपापल्या समस्या वीज ग्राहकांनी मांडल्या. यावेळी वैभववाडी व कणकवली येथील समस्या संतोष नाईक, प्रणय बांदिवडेकर, गुरुनाथ कुलकर्णी यांनी मांडल्या. देवगड, मालवणच्या समस्यांबाबत नंदन वेंगुर्लेकर यांनी भाष्य केले. महेश खानोलकर, नारायण (बाळा) जाधव यांनी सावंतवाडी तालुक्यातील समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने मळेवाड येथून घालण्यात येणारी नवीन वीज वाहिनी, सोनुर्ली येथे सर्वेक्षण झालेले सबस्टेशन, गावात पूर्वी आणि आता वाढलेल्या वीज कनेक्शन नुसार असलेली वायरमनची कमतरता, बेशिस्त वर्तन करणारे कर्मचारी, वायरमन, काही अधिकारी, वायरमन फोनला उत्तर देत नाहीत याबद्दल जाब विचारला तर जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर यांनी सावंतवाडी शहरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, पुरवठा केले जाणारे तकलादू विजेचे सामान, स्मार्ट प्रीपेड मीटर जबरदस्तीने का बसविले जातात ? तात्काळ स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे थांबवा अशा सूचना केल्या. यावर स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. समीर शिंदे यांनी आठ आठ तास दानोली आदी गावांतील स्ट्रीट लाईट दिवस सुरू असते यावर प्रकाशझोत टाकला. सावंतवाडीत सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे अधिकाऱ्यांना राजू पनवेलकर यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
कुडाळ तालुकाध्यक्ष गोविंद सावंत यांनी कुडाळमध्ये झाडे कटिंग न केल्याने दिवसभर वीज खंडित होत असल्याची तक्रार केली. पिंगळी सरपंच आकेरकर यांनी गावात गार्डिंग करून घेण्याची सूचना केली तसेच लाखो रुपये गावातील नळपाणी योजनेच्या पंप दुरुस्तीला खर्च होतो तो केवळ महावितरणच्या चुकीमुळे होत असल्याचा आरोप केला. पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी देखील महामार्गालगत गाव असून वीज खंडित होत असल्याने वाहिन्यांना लागणारी बांबूची बेट तोडण्याची मागणी केली. माणगाव, मोरे येथील विकास माणगावकर, विजय माणगावकर यांनी येथील व्यथा मांडल्या. तब्बल ६० किमी असलेल्या शिवापूर येथून सरपंच सुनीता शेडगे आल्या होत्या. गावात १५ /१५ दिवस विजेचा पत्ताच नसतो. त्यामुळे शिवापूर येथे पुढील बुधवारी सरपंच, ग्रामस्थ यांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब यांनी समस्यांचा पाढा वाचला. वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी साईनाथ आंबेडकर यांनी कसाल, ओरोस आदी भागातील समस्या मांडल्या.
वेंगुर्ला तालुक्यातील समस्या संजय गावडे यांनी मांडल्या. यामध्ये वेंगुर्ला शहरासाठी अभियंत्यांची मागणी, अखंडित वीज पुरवठा, जास्त क्षमतेची विद्युत रोहित्र आदीच्या मागण्या केल्या. दोडामार्ग तालुक्यातील समस्या तालुकाध्यक्ष सुभाष दळवी यांनी पोटतिडकीने मांडल्या. त्यांच्यासोबत सचिव भूषण सावंत, उपाध्यक्ष संजय गवस, सरपंच संघटना अध्यक्ष अनिल शेटकर आदींनी मांडल्या. यावेळी महालक्ष्मी वीज प्रकल्पासोबत करार करून दोडामार्ग तालुक्यासाठी महालक्ष्मीची वीज उपलब्ध करावी, इन्सुली ते दोडामार्ग अंडरग्राऊंड लाईन करावी, दोडामार्ग येथील मोडकळीस आलेले वीज खांब, जुनाट वाहिन्या, हाताला टेकतात अशा उंचीवर असलेल्या वीज वाहिन्या, जंगलातून गेलेली मुख्य वीज वाहिनी रस्त्याच्या कडेने अथवा भूमिगत करणे, विजेचा धक्का लागून मरण पावलेल्या मांगेली येथील युवकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, अधिकाऱ्यांची रिक्तपदे भरणे, भेडशी येथील सहा.अभियंता निलंबित करणे अशा अनेक मागण्या सुभाष दळवी यांनी केल्या.
जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी कधी आक्रमक तर कधी संयमाने घेत वीज ग्राहकांच्या समस्या कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता माळी आणि कुडाळ विभागाच्या वनमोरे यांच्यासह अधीक्षक अभियंता यांच्या कडे मांडल्या. शेवटी जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी नूतन अधीक्षक अभियंता यांच्याकडून जिल्ह्यातील वीज समस्या लवकरात लवकर सोडवून वीज ग्राहकांना अपेक्षित असे काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्र.जिल्हाध्यक्ष संजय लाड यांनी जिल्ह्यातील मुख्य वीज समस्या का निर्माण होतात याचा अधिकाऱ्यांनी सारासार विचार करू जिल्ह्यात अखंडित वीज पुरवठा व्हावा अशी मागणी करून बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल वीज ग्राहक, सरपंच संघटनेचे सरपंच, पदाधिकारी, व्यापारी महासंघ पदाधिकारी आणि महा अधिकाऱ्यांचे आभार मानले.
या बैठकीसाठी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता कुडाळ वनमोरे, कणकवलीचे कार्य.अभियंता माळी यांच्यासह वीज ग्राहक संघटनेचे शिवराम आरोलकर, गोविंद कुडाळकर, शेखर गावडे, नारायण गोसावी, नेरूळ सरपंच भक्ती घाडीगावकर, किरण खानोलकर वाल्मिकी कुबल, उद्योजक संजय तांडेल, अजय नाईक, बाव सरपंच अनंत आसोलकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, झोळंबे उपसरपंच विनायक गाडगीळ, मायकल लोबो, दोडामार्ग सरपंच सेवा संघाचे अनिल शेटकर, गोपाळ गवस आदि वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुडाळ पीएसआय भांड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.