
सावंतवाडी : मान्सूनपूर्व काळात उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सावंतवाडीतील वीज ग्राहक संघटना आणि जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आज सायंकाळी ४ वाजता सावंतवाडीच्या महावितरण उपविभाग कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीत ग्राहक संघटनांचे पदाधिकारी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांच्याशी चर्चा करून ठोस निर्णय घेणार आहेत. संभाव्य वीज व्यत्यय आणि इतर समस्यांवर वेळीच उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड यांनी संघटनेच्या सर्व कार्यकारणी सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.