वीज ग्राहकांसह माजी सैनिक, महिला आक्रमक ; महावितरण मेळाव्यात स्थानिक अधिकारी टार्गेटवर !

ग्राहकांचे प्रश्न सोडविणे महावितरण कर्मचाऱ्यांच आद्य कर्तव्य : कार्यकारी अभियंता विनोद विरप
Edited by: विनायक गावस
Published on: November 16, 2022 20:14 PM
views 280  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित शाखा सावंतवाडी उप विभाग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांच्या सहकार्यानं शेतकरी, औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहक मेळावा सावंतवाडी इथं आयोजित करण्यात आला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. वर्षांनुवर्षे प्रलंबित प्रश्नांवरून ग्राहकांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. आपले प्रश्न मांडत अधिकाऱ्यांना धारेवर धरल. तर कामात कसूर करणाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिलांसह माजी सैनिकांनी देखील स्थानिक वीज वितरण अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या वागणुकीबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, कार्यकारी अभियंता विनोद विरप यांनी ग्राहकांचे प्रश्न ऐकून घेत तक्रारींच तातडीने निवारण करण्याचे आदेश संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना दिले.


 श्रीराम वाचन मंदिर इथं हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित वीज वितरण ग्राहकांनी अधिकारी तक्रारींची दखल घेत नसल्यान आक्रमकपणे जाब विचारला. वीज वितरणचे अधिकारी प्रश्न सोडवत नसतील, लोकांना वेठीस धरत असतील तर त्यांच्यावर निलंबनात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामिण भागातील महिलांनी देखील समस्यांकडे स्थानिक अधिकारी दखल घेत नसल्याची तक्रार केली. वाढीव शुल्काबाबत देखील जाब विचारण्यात आला. दरम्यान, २० एप्रिल रोजी सावंतवाडी शहरात झालेल्या लोडशेडींगची कल्पना नागरिक तथा ग्राहक व पोलीस प्रशासनाला का दिली नाही ? हे अघोषित लोडशेडींग कुणाच्या आदेशान झालं ? या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तर ७ महिने उलटून देखील वीज वितरणकडून का मिळत नाही? संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल कार्यकारी अभियंता यांना केला. स्थानिक महावितरण अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या वागणुकीबाबत मडुरा येथील महिलेसह माजी सैनिक गुरू गावडे यांनी रोष व्यक्त करत नाराजी व्यक्त केली‌. दरम्यान, रमेश बोंद्रे, पुंडलिक दळवी, सुरेश भोगटे, देवेंद्र टेंमकर, अभय पंडीत, सुभाष गोवेकर आदींसह वीज ग्राहकांनी अधिकाऱ्यांना रखडलेल्या कामासह, वाढीव वीज बील व महावितरणकडून ग्राहकांना मिळणाऱ्या वागणूकीबाबत जाब विचारला. माजी सैनिक, महिलांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकारी फोन उचलत नसतील, लोकांची कामं करत नसतील तर त्यांना घरी पाठवा अशी मागणी कार्यकारी अभियंता विनोद विरप यांच्याकडे केली. तर वर्षभर पत्राची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्याच निलंबन करा अशी मागणी नंदन वेंगुर्लेकर यांनी केली‌. यावेळी कुडाळ कार्यकारी अभियंता विनोद विरप यांनी ग्राहकांचे प्रश्न मार्गी लावले जातील व समस्या सोडविण्याल्या जातील अशी ग्वाही उपस्थितांना  दिली. यावेळी जिल्हा व्यापारी संघ अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय भोगटे, कार्यकारी अभियंता विनोद विरप, नंदन वेंगुर्लेकर, श्रीपाद चोडणकर,  ग्राहक पंचायत अध्यक्ष अनंत नाईक, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर किरण सिध्दये, चित्तरंजन रेडकर,  उप कार्यकारी अभियंता संदीप भुरे, धर्मराज मिसाळ, बाळासाहेब बोर्डेकर, लवू मिरकर, द्वारकानाथ घुर्ये, अनंत नाईक, एकनाथ गावडे, पुंडलिक दळवी, दिलीप भालेकर, देवेंद्र टेंमकर, सुरेश भुगटे, संतोष गावस, किशोर चिटणीस आदिंसह मोठ्या संख्येने व्यापारी संघाचे सदस्य व ग्राहक उपस्थित होते.


 मडुरा सारख्या ग्रामीण भागात चार-चार दिवस लाईट नसते. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणारी आमची मूल, शालेय विद्यार्थ्यांसह आम्हा गृहिणींचे हाल होतात‌. ट्रान्सफॉर्मर बिघडलाय अशी कारण वारंवार अधिकारी आम्हाला देतात. लेखी अर्ज करा यापुढे कोणत्याही प्रकारची कार्यवाही त्यांच्याकडून होत नाही. आजच्या मेळाव्यात याबद्दल लक्ष वेधल असून यावर तोडगा काढू असं आश्वासन दिल. : सौ. वालावलकर,मडूरा. 


ग्राहक अन् महावितरण अधिकाऱ्यांत समन्वय घडवून आणल्याबद्दल व्यापारी संघाचे आभारी आहोत. आजच्या मेळाव्यात विविध समस्यावर चर्चा झाली. या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या मार्गी लागत आहेत. त्यामुळे भविष्यात महावितरण अधिकारी देखील चांगली सेवा वीज ग्राहकांना देतील. : पुंडलिक दळवी, पदाधिकारी व्यापारी संघ.


 वीज ग्राहकांना सेवा देण हे महावितरणच कर्तव्य आहे. त्यांना न्याय मिळवून देण आवश्यक आहे. तालुक्यात चार हजार मीटर फॉल्टी असतील तर ती दुर्दैवीबाब आहे. महावितरणच्या माध्यमातून ग्राहकांवर अन्याय होत असेल तर यापुढे होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न राहतील. : बाळासाहेब बोर्डेकर, पदाधिकारी, व्यापारी संघ 


ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी या मेळाव्याच आम्ही आयोजन केल होत. चर्चेतून ग्राहकांचे प्रश्न निकाली काढण्यात आले आहेत. नंदन वेंगुर्लेकर यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत ग्राहकांच्या प्रश्नांना उकल प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार. भविष्यात देखील व्यापारी महासंघ ग्राहकांच्या पाठीशी राहणार असून अन्याय होऊ देणार नाही. : जगदीश मांजरेकर, तालुकाध्यक्ष, व्यापरी संघ


आजच्या वीज ग्राहक मेळाव्यातून ग्राहकांचे प्रश्न अधिकाऱ्यांसमोर मांडले आहेत. यानंतर आम्ही 

पूर्तता मेळावा,आढावा बैठक घेऊ. हे प्रश्न निकाली न लागल्यास एक महिन्यानंतर यांचा  जाब विचारू. ग्राहकांच्या तक्रारी न सोडवील्यास शांत बसणार नाही. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा, आम्ही ग्राहक म्हणून सहकार्यच करू : नंदन वेंगुर्लेकर, ‌सदस्य, जिल्हा व्यापारी महासंघ


ग्राहकांचे प्रश्न वेळीच निकाली लागण काळाची गरज आहे. त्यांचे प्रश्न सोडवण हे महावितरण कार्मचाऱ्यांच आद्य कर्तव्य आहे. ते कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा सुचना आम्ही त्यांनां केल्या आहेत. अशा पद्धतीने ग्राहक मेळावे घेऊन त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू : विनोद विरप, कार्यकारी अभियंता, महावितरण