
मालवण : समोरून येणाऱ्या सायकलस्वाराला बाजू देण्याच्या प्रयत्नात एका कारने रस्त्या लगतच्या वीज खांबाला धडक दिली. ही घटना आज सायंकाळी मालवण भरड येथील रांगोळी महाराज मठाच्या नजीक गवंडीवाडा- दांडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडली. या अपघातात सिमेंटचा वीज खांब तुटल्याने वीज वितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. तर कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी कोल्हापूर येथील एक कार मालवण भरड येथील रांगोळी महाराज मठाच्या बाजूने गेलेल्या रस्त्यावरून गवंडीवाडा मार्गे दांडीच्या दिशेने जात होती. या कार मध्ये चार ते पाच जण प्रवासी होते. यावेळी समोरून अचानक आलेल्या सायकलस्वाराला बाजू देण्याच्या प्रयत्नात कार चालकाने कार उजव्या बाजूला घेतली असता कार रस्त्यालगत असलेल्या सिमेंटच्या वीज खांबाला धडकली. यात सिमेंट खांब खालच्या बाजूने तुटून वाकला होता तसेच वीज तारा खाली आल्या. सुदैवाने यात कोणालाही दुखापत तसेच जीवितहानी झाली नाही. यावेळी वीज वितरण अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, कार मधील मंडळींनी वीज पोलाची नुकसान भरपाई वीज कंपनीला दिल्यावर हे प्रकरण मिटविण्यात आल्याचे समजते.