पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका 15 जूननंतर घ्याव्यात !

वेणूनाथ कडू यांची मागणी !
Edited by: भरत केसरकर
Published on: May 09, 2024 14:09 PM
views 86  views

सिंधुदुर्ग : कोकण पदवीधर मतदारसंघासह महाराष्ट्रातील पदवीधर व शिक्षक अशा चार विधान परिषदेच्या निवडणुका 10 जूनला घेण्यात येणार आहेत. ह्या निवडणूक तारखा चुकीच्या आहेत.  त्यामुळे निवडणूक आयोगाने तात्काळ या तारखा बदलून महाराष्ट्रातील शाळा सुरू झाल्यानंतरच 15 जून नंतर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे सुद्धा वेणूनाथ कडू यांनी यासंदर्भाची मागणी केली आहे.

   महाराष्ट्रात चार विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक आमदारांची मुदत चार जुलै ला अर्थात जुलैच्या  पहिल्या आठवड्यामध्ये संपत आहे. निरंजन वसंत डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघ (भाजप), विलास विनायक पोतनीस,मुंबई पदवीधर मतदारसंघ (ठाकरे गट), किशोर शिवाजी दराडे, नाशिक शिक्षक मतदारसंघ (ठाकरे गट) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील,मुंबई शिक्षक मतदार संघ (लोकभारती) या चार आमदारांची मुदत सात जुलैला संपत आहे. त्यामुळे या निवडणुका होत आहेत.

     खरंतर महाराष्ट्रात शाळा 15 जून पासून शाळा सुरू होत आहेत. तर विदर्भात एक जुलै पासून शाळा सुरू होत आहेत. 10 जूनला निवडणुका झाल्या तर कोकणसह मुंबई, नाशिक भागातील शिक्षक हे आपापल्या भागामध्ये सुट्टी साठी असणार आहेत. हे शिक्षक 14 जून रोजी आपापल्या गावी दाखल होतील आणि 15 जून पासून शाळा सुरू होतील. त्यामुळे मोठा फटका सर्वच उमेदवारांना बसणार आहे. खरंतर उमेदवारांना प्रचार सुद्धा करता येणार नाही. त्यामुळे ही निवडणूक 10 जून नंतर घेण्यात यावी.शक्यतो ही निवडणूक जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 15 जूननंतर  घ्यावी अशी मागणी वेणूनाथ कडू यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आज केली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातले लेखी पत्र त्यांच्या स्तरावरून पाठवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तर वेणूनाथ कडू यांनी निवडणूक आयोगाला सुद्धा पत्र लिहून ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी असे मागणी केली आहे.

खरं तर सध्या मे महिन्याची सुट्टी असून या उन्हाळी सुट्टीसाठी मतदार असलेले शिक्षक आपापल्या गावी गेले आहेत. आणि अशावेळी ही निवडणूक घेतल्यास फार मोठा तोटा आणि फटका हा उमेदवारांना सहन करावा लागणार आहे. यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी. अशी मागणी वेणूनाथ कडू यांनी केली आहे.  त्यामुळे निवडणूक आयोग आता काय निर्णय घेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.