
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी उद्या मतदान होत असून, आज कुडाळ तहसीलदार कार्यालयातून निवडणूक पथके मतपेट्यांसह आपापल्या केंद्रांकडे रवाना झाली आहेत. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कडक पोलीस बंदोबस्तात हे कामकाज पार पडले.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चोख नियोजन करण्यात आले आहे. प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुसे आणि तहसीलदार सचिन पाटील यांनी सर्व निवडणूक प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन केले. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रांवर आणि मतपेट्या नेणाऱ्या वाहनांना कडक पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे.

उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होणार असल्याने, निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक मतपेट्या व इतर आवश्यक साहित्यासह केंद्रांवर पोहोचले आहे. दुर्गम भागातील केंद्रांकडे जाणाऱ्या पथकांचे विशेष नियोजन करण्यात आले होते.
जनतेचा कौल कोणाकडे?- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असून, उद्या प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्याच्या विकासासाठी जनता कोणाच्या पदरात माप टाकणार आणि कोणाचे भवितव्य उजळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उद्याच्या मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.










