
दोडामार्ग : जमीन विकायची नाही असा ठाम निश्चय असेल, तर कोणतीही शक्ती वडिलोपार्जीत मालमत्तेवर घाला घालू शकत नाही. कायद्याचे संरक्षण, गावाचे ऐक्य आणि निश्चय हीच खरी ताकद असल्याचे प्रतिपादन जेष्ठ विधीज्ञ अॅड. संदीप निंबाळकर यांनी येथे केले. कोलझर ग्रामस्थांनी आपल्या वडिलोपार्जीत जमिनी विकायच्या नाहीत, असा सामूहिक निर्णय घेतला असून पर्यावरण संवर्धन व त्यावर आधारित लोकजीवन जपण्यासाठी हा निश्चय करण्यात आला आहे. परिसरात जमिनी खरेदीसाठी बाहेरील दबावतंत्र वाढत असताना, त्याविरोधात ग्रामस्थांनी एकजुटीने लढा उभारला आहे. ग्रामस्थांच्या विनंतीवरून गुरुवारी सायंकाळी आयोजित कायदेविषयक संवाद उपक्रमात अॅड. निंबाळकर बोलत होते.
ते म्हणाले, “पूर्वजांनी जपलेल्या जमिनी न विकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय कौतुकास्पद आहे. कायद्याचे पूर्ण संरक्षण तुमच्या पाठीशी आहे. गावकरी एकत्र राहिले आणि निश्चयावर ठाम राहिले, तर कोणतीही धनशक्ती यशस्वी ठरू शकणार नाही. ही संपत्ती पुढील पिढीकडे जपून सुपूर्द करणे हे आपले कर्तव्य असून कोलझरवासिय ते समर्थपणे पार पाडत आहेत.”
यावेळी कोलझर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शामराव देसाई, हिरबा उर्फ आपा देसाई, महादेव देसाई, विश्वास देसाई, दौलत देसाई, राजाराम देसाई, बाळा देसाई, विकास सावंत, डी. बी. देसाई, सुदेश देसाई, देवेंद देसाई, मुरारी मुंगी, अनिल देसाई, प्रभाकर देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यातील अन्य गावांनी कोलझरचे अनुकरण करावे
जमिनी खरेदीसाठी सर्वत्र दबावतंत्र वाढले असून गावातील ऐक्यच त्याविरोधातील खरी ताकद आहे. कोलझरवासियांच्या भूमिकेला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हे उदाहरण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांनी घेतल्यास जिल्ह्याचे वैभव टिकून राहील, असे अॅड. निंबाळकर यांनी सांगितले.










