
कुडाळ : सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या निवडणूक मतदानास सुरुवात झाली आहे. आज सकाळीच ८ वाजता माणगाव हायस्कूल येथे मतदानास सुरूवात झाली. १२ जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात असून ३८ वर्षानंतर प्रथमच ही निवडणुक होत आहे. या निवडणुकीमध्ये विद्यमान सहकार महर्षी जाधव साहेब सहकार पॅनलचे प्रमुख प्रकाश मोर्ये यांच्या विरुद्ध दादा बेळणेकर यांचे सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव सहकार वैभव पॅनल अशा दोन पॅनल मध्ये थेट लढत होत आहे.
सर्वोदय पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष असलेले आणी जिल्हा बॅकेचे संचालक असलेले भाजपचे प्रकाश मोर्ये यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असून प्रकाश मोर्ये यांच्या हातून सत्ता खेचून घेण्यासाठी भाजपचे दादा बेळणेकर,भाजपचे माजी शिक्षण सभापती सगुण धुरी,दिलीप माळकर,माजी चेअरमन सुभाष भिसे यांच्यासह दादा बेळणेकर यांचे चिरंजीव भाजपचे योगेश बेळणेकर या सर्वाच्या नेतृत्वाखाली विरोधी पॅनलने शड्डू ठोकून आहेत. त्यामुळे ही निवडणूक निश्चितच रंगतदार आणी अटीतटीची मानली जात आहे.
भाजपमधील दोन गट ऐकमेकाविरोधात उभे ठाकले असून प्रकाश मोर्ये आणी दादा बेळणेकर यांच्या अस्तित्वाची ही लढाई मानली जात आहे.सर्वोदय पतसंस्थेचे एकुण १९९७ सभासद मतदान करणार आहेत.विद्यमान संचालकात प्रकाश मोर्ये,मुकुंद धुरी,जोसेफ डॉन्टस,उत्तम सराफदार,संदेश राणे,कविता कुडतरकर हे सत्ताधारी पॅनल कडून तर दादा बेळणेकर,सुभाष भिसे हे विरोधी पॅनलकडून रिंगणात आहे.असे आठ संचालक पुन्हा रिंगणात आहेत. सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत माणगाव हायस्कूल मध्ये मतदान होत आहे.यानंतर एक तासाच्या विश्रांतीनंतर लगेजच याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
दोन्ही पॅनलकडून मतदार आणण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.पहिल्यांदाच ही निवडणूक होत असल्याने माणगाव खोऱ्यातील राजकीय वातावरणच ढवळून निघाले आहे.