देवगड उमाबाई बर्वे लायब्ररीची निवडणूक बिनविरोध

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 17, 2024 11:50 AM
views 365  views

देवगड : देवगड येथील उमाबाई बर्वे लायब्ररीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध झाली.मा.आमदार ॲड.अजित गोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली  या संस्थेचे कामकाज सुरु झाले नवनिर्वाचित अध्यक्ष डाॅ.गुरुदेव परुळेकर यांनी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांना सोबत घेवून लायब्ररीचा विस्तार करण्याचा संकल्प यावेळी केला. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर यांनी लायब्ररीचे कार्य देवगडमधील शाळांमधून, संस्था व मंडळामधून व्हायला हवे व त्यासाठी मी पुढाकार घेईन असे सांगितले.लायब्ररीसारख्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याचा आनंद काही औरच असतो असेही ते या प्रसंगी म्हणाले. या संस्थेतील पदाधिकारी व सदस्य हे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे पुढील काळात लायब्ररीला प्रगतिपथावर नेण्याचा संकल्प केला. या वेळी सरस्वती पूजन व वाचन प्रेरणादिन असे कार्यक्रम सादर करण्यात आले.

दि. १५ ऑक्टोबर रोजी माजी  राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची जयंती  म्हणजे वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथालयामध्ये ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.  या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन देवगड महाविद्यालयाचे इतिहास  विभागाचे प्रा. सचिन दहीबावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. दहीबावकर यांनी 'देवगड किल्ल्याचा इतिहास' या विषयावर व्याख्यान दिले.यावेळी बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले.