हक्काचा खासदार निवडून द्या : नितेश राणे

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 11, 2024 13:54 PM
views 211  views

कणकवली : मोदी साहेबांना आपल्याला पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. लोकसभेला नारायण राणे साहेबांना आपल्याला हक्काचा खासदार म्हणून निवडून द्यायचे आहे. कलमठ जिल्हा परिषद विभाग हा आमचा घरचा मतदारसंघ आहे. मागील 10 वर्षे मी आपला आमदार म्हणून प्रत्येक घरापर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न केला आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या भागात 100 टक्के भाजपाचे सरपंच अगदी ठासून निवडून आले आहेत. 7 मे रोजी या जिल्हा परिषद मतदारसंघात जसा ग्रामपंचायत निवडनुकीत जसे 80 टक्के मतदान मिळवले तसे लोकसभा उमेदवार म्हणून नारायण राणे साहेबांना 90 टक्के मतदान मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. जे लीड तुम्हाला सरपंच निवडणुकीत मिळाले त्यात तसूभरही कमी मतदान मला चालणार नाही. अन्यथा विकासकामाला निधी वेळेत मिळाला नाही तर तक्रार करायची नाही असा इशाराच आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा कलमठ विभागातील महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा वृंदावन हॉल कलमठ येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते. पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, वरवडे गावात भाजपाला 100 टक्के मतदान मिळून देण्याचे वचन प्रकाश सावंत, सोनू सावंत यांनी दिले आहे. यावेळी पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की केंद्र सरकारशी बोलणारा आम्हला खासदार आम्हाला पाठवायचा आहे. केंद्राशी बोलायचे असेल तर तशा ताकदीचा खासदार निवडून देणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने ग्रामपंचायत निवडणूकीला आपण प्रचार यंत्रणा लावली तशीच यंत्रणा आता लोकसभा निवडणुकीला लावणे गरजेचे आहे.  येत्या 25 दिवसांमध्ये कलमठ विभागातील सर्व मतदारांपर्यंत पोचून हक्काचा हक्काचा खासदार निवडून द्या. यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, कलमठ गावप्रमुख सुनील नाडकर्णी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती प्रकाश सावंत, उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, आशिये सरपंच महेश गुरव, पिसेकामते सरपंच सौ. प्राजक्ता मुद्राळे, शिवसेना कणकवली शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, माजी पं स सदस्य महेश लाड, पपू पुजारे, सदा चव्हाण आदी उपस्थित होते. प्रास्ताविक महेश गुरव यांनी, सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले.