
देवगड : देवगड कुणकेश्वर येथे सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ यांच्यावतीने सकल समाजाच्या सुख-समृध्दीप्रित्यर्थ स्वयंभू शिवालय श्री देव कुणकेश्वर येथे लघुरुद्राभिषेक व तेली समाजभूषण, दानशूर व्यक्तिमत्व श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टअध्यक्ष एकनाथ तेली यांचा सन्मान सोहळा कुणकेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता.
माझ्या छोट्याशा कार्याची दखल तेली समाजाने घेऊन मोठा दिमाखदार कार्यक्रम आयोजित करून माझा सन्मान केला त्याने मी भारावून गेलो आहे. या सन्मानाच्या रूपाने समाज बांधवांचा मी ऋणी आहे. ज्या समाजात मी जन्माला आलोय त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी मी आज पर्यंत काम केले. मोठेपणासाठी किंवा काहीतरी मिळवण्यासाठी नाही. जे केले ते चांगल्या भावनेने केले. यापुढेही करीत राहिन, असे प्रतिपादन कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले.
कुणकेश्वर येथे सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजाच्यावतीने एकनाथ तेली यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व तालुक्याच्या वतीने देखील श्री. तेली यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त सकाळी श्री कुणकेश्वर मंदिरात लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. यावेळी बोलताना एकनाथ तेली म्हणाले, तेली समाज हे माझे कुटुंब आहे. आणि कुटुंब म्हणूनच मी त्याकडे पाहतो आहे. मी जिल्हाध्यक्ष असताना प्रत्येक तालुक्यात अगदी तळागाळा जाण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला. समाजासाठी चांगले उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. माझ्या तेली समाजातील प्रत्येक व्यक्ती गुण्या गोविंदाने राहिला पाहिजे. माझा समाज सधन झाला पाहिजे. समाजातील मुलांना चांगले शिक्षण व चांगले संस्कार मिळावेत यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो. मालवण येथील काजू व कोकमचे उद्योजक सुरेश नेरुरकर यांनी तेली समाजातील तरुण व मुलांसमोर आदर्श उदाहरण आहे. त्यांच्या सारखे काम करून स्वतःसह समाजाची उन्नती साधली पाहिजे, असेही ते म्हणाले.नेहमी माणसाचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. शंभर रुपये असतील तेव्हा पण आणि शंभर कोटी असतील त्यावेळेसही तोच स्वभाव असला पाहिजे. ज्या रक्तात मी या जन्माला आलो आहे आणि त्या रक्ताच्या प्रत्येक माणसाला आपल्याबरोबर घेतले पाहिजे असे विचार आपले असले पाहिजेत, असे ते म्हणाले.
यावेळी प्रा. शरद शेटे, राजन आचरेकर आदींनी आपले विचार मांडले. यावेळी कातवण शाळेच्या मुलांनी सुंदर असे समई नृत्य सादर केले.या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रभारी जिल्हाध्यक्ष तुकाराम तेली,उद्योजक सुरेश नेरुरकर, उपाध्यक्ष निलेश कामतेकर, सचिव परशुराम झगडे, खजिनदार चंद्रकांत तेली, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शैलेश डिचोलकर, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, कुणकेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गोविंद घाडी, देवगड कॉलेजचे उपप्राचार्य शरद शेटे, तेली समाजाचे सावंतवाडी येथील जेष्ट कार्यकर्ते जयराम आजगावकर, दिनकर तेली, जिल्हा तेली समाजाचे सल्लागार आबा तेली, बापू तळवडेकर, कणकवली तालुकाध्यक्ष दयानंद हिंदळेकर, संजय कवठकर, मालवण तालुकाध्यक्ष राजन आचरेकर, देवगड तेली समाजाचे नारायण हिंदळेकर, विजय शेट्ये, वैभववाडी अध्यक्ष पांडुरंग कोर्लेकर, सुर्यकांत तेली, साईनाथ आंबेरकर, सौ. शुभांगी तेली, सौ. सुमित्रा एकनाथ तेली, आदी उपस्थित होते.