‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’

CM एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचं ३० मेला ठाण्यात प्रकाशन
Edited by: विनायक गांवस
Published on: May 28, 2023 21:41 PM
views 98  views

ठाणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी ३० मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ लेखक गंगाराम गवाणकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी ५ वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.


‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याचा लेखाजोखा या ग्रंथात मांडला आहे. ग्रंथाली प्रकाशनाच्या माध्यमातून हा चरित्रग्रंथ प्रसिद्ध होत असून शारदा एज्युकेशन सोसायटी, कोकण मराठी साहित्य परिषद यांच्याद्वारे हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या चरित्रग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ लेखक गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते होणार असून गायक अनुप जलोटा, सोनू निगम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या सोहळ्याच्या निमंत्रकांकडून देण्यात आली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय, सामाजिक तसेच कौटुंबिक जीवनातील संघर्षशील प्रवासाचा लेखाजोखा मांडणाऱ्या या चरित्रग्रंथाचे लेखन सुप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी, समकालीन मंडळी, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखतींच्या आधारे हा चरित्रग्रंथ शब्दबद्ध केला आहे. त्यासाठी डॉ. अरुंधती भालेराव, राजन शंकर बने, सान्वी ओक यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे चरित्रलेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय साताऱ्याहून मुंबईत आले, तिथून ते ठाणे येथे स्थायिक झाले. हा सारा त्यांचा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला. मात्र कष्टाच्या, निष्ठेच्या आणि सचोटीच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी विलक्षण झेप घेतली. या त्यांच्या वाटचालीतील विविध प्रसंग, घटना-घडामोडी यांच्या आधारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि नेतृत्वाची घडण कशी झाली, हे महाराष्ट्रीय जनांपुढे मांडण्याच्या प्रांजळ हेतूने ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ हे चरित्र शब्दबद्ध केल्याचे प्रा. डॉ. ढवळ यांनी सांगितले. 

'योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे' या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचार आणि कार्याचे मर्म सांगणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. अनघा मोडक या मुंबईतील तरुण निवेदिका आणि व्याख्याती आहेत. वयाच्या २५ व्या वर्षी अचानक दृष्टी गमावल्यानंतरही मेहनत आणि प्रतिभेच्या बळावर त्यांनी निवेदन आणि जनसंवाद क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, त्यांचा त्याग, त्यांचे जीवन यांबद्दल अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीत अनघा मोडक यावेळी मांडणी करणार आहेत, अशी माहिती प्रकाशन सोहळ्याच्या निमंत्रकांकडून देण्यात आली.