
दोडामार्ग : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावरील झाडी मारण्याकडे व खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने भाजप कार्यकर्ते एकनाथ नाडकर्णी व कार्यकर्त्यांनी आज बांधकाम कार्यालयात धडक दिली. उपकार्यकारी अभियंता संभाजी घंटे यांचा सत्कार केला. त्यांच्या सहकाऱ्यांकडे श्रीफळ देऊन घंटे यांच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितले. तसेच चतुर्थी पूर्वी रस्त्यावरील झाडी साफ करण्याचा इशारा दिला.
दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यावरील झाडी वाढली आहे. तसेच काही ठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. यामुळे वाहनं चालकांना त्याचा त्रास जाणवत आहे. चतुर्थी सण अवघ्या आठ दिवसावर येऊन ठेपला असून अद्यापही रस्त्यावरची झाडी मारून साफसफाई करण्यात आली नाही. काही ठिकाणी पडलेले खड्डे देखील बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. चतुर्थीच्या सणासुदीत येणाऱ्या चाकरमान्यांना तसेच वाहतूक दरानं त्रास होणार याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप कार्यकर्ते एकनाथ नाडकर्णी, माजी भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, कळणे सरपंच अजित देसाई, संजय विरणोडकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला धडक दिली. बांधकाम विभागाच्या अभियंता सीमा गोवेकर यांची भेट घेऊन बांधकाम विभागाच्या चाललेल्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. तसेच बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांच्या कामकाजावर संतापही व्यक्त केला. सांगितलेले काम वेळेत होत नसून कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे त्यांचे श्रीफळ देऊन सत्कार करणार असल्याचे सांगताच घंटे यांची तब्बेत ठीक नसल्याने ते सध्या सुट्टीवर आहेत. ते नसले तरी त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावा त्यांच्याकडे श्रीफळ देऊ असे सांगतच घंटे यांच्या सत्कारासाठी आणलेला श्रीफळ त्यांच्याकडे देऊन घंटे यांच्यापर्यंत पोचविण्यास सांगितले.