
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात "एक पेड माँ के नाम" हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या प्रेमाला व सन्मानाला समर्पित करत एक झाड लावले आणि त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र वारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी “आई म्हणजे जीवनाची सुरुवात करणारी शक्ती आहे आणि निसर्ग हे जीवनाचे अस्तित्व टिकवणारे माध्यम आहे. या दोन्हींचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत योग्य आहे.” असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले याप्रसंगी विद्यालयातील उपप्राचार्य विजय चव्हाण,पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी झाडांना आपल्या आईच्या नावाने ओळख देत त्यांच्यावर नावाच्या फलकांची नोंद केली. हा उपक्रम केवळ पर्यावरण संवर्धनासाठीच नव्हे तर मातृत्वाच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा ठरला. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम व कृतज्ञता यांची रुजवणूक होते, असे मत पर्यावरणप्रेमी व उपक्रमाचे संयोजक साजिद चिकटे यांनी व्यक्त केले.