
सावंतवाडी : माझ्या घरात मी पुन्हा सक्रिय झालो आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत सक्रीय होण्याच पत्र देण्यात आलं. माझ्यासारख्या तरुण मुलाला सक्रीय होण्याची संधी पुन्हा पक्षानं दिली. त्यामुळे या मतदारसंघात रोजगार आणण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण यांच्या आशीर्वादाने निश्चितच मी यात यशस्वी होईल असा विश्वास युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला.
श्री. परब यांचे आज सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मुलगा चुकला तर आई-वडील माफ करतात. त्याचप्रमाणे माझ्यासारख्या तरुण मुलाला सक्रीय होण्याची संधी पक्षानं पुन्हा दिली आहे. घरवापसीनंतर कोकणात माझं मोठं स्वागत झालं. आजचा दिवस आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. या मतदारसंघात रोजगार आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. रोजगारासाठी इथला तरुण बाहेर जात आहे. त्यामुळे त्यांना इथेच रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आशीर्वाद मला मिळाला आहे. त्यामुळे आरोग्य व रोजगार प्रश्न सोडविण्यासाठी माझा निश्चित प्रयत्न राहील. उद्यापासून पक्ष देईल ती जबाबदारी पुर्ण करेन, केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच काम करेन असं मत त्यांनी व्यक्त केले.
सावंतवाडीत जंगी स्वागत !
दरम्यान, सावंतवाडी येथे रॅलीच्या माध्यमातून ढोल पथकाच्या जयघोषात व फटाक्यांच्या आतिषबाजीत विशाल परब यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, अँड अनिल निरवडेक, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, रविंद्र परब, वैदेही परब, प्रसन्न देसाई, अजय गोंदावळे, विनोद राऊळ, दिलीप भालेकर, ॲड संजू शिरोडकर, जितू गावकर, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, मेघना साळगावकर उपस्थित होते.