सिंधुरत्न योजनेद्वारे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न : दीपक केसरकर

Edited by: विनायक गावस
Published on: March 12, 2024 13:04 PM
views 140  views

सावंतवाडी : सिंधुरत्न योजनेद्वारे पर्यटन वाढीसाठी माझे प्रयत्न आहेत. यासाठी टेंट व निवासी व्यवस्था या योजनेतून कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प या ठिकाणी उभारले जाणार आहेत. याकरिता जिल्ह्यातील तब्बल दोनशे लाभार्थाना मंजुरी पत्र देण्यात येत असून निश्चितच यातून पर्यटन वाढीस मदत होईल, शिवाय सिंधुरत्न योजनाही यशस्वी होईल अस प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा सिंधूरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी व्यक्त केल. तर टीका करणारे टीका करत राहतात आपण आपलं काम करत राहायचं. परंतू मी एकट्यान काम केलेलं चालणार नाही तर त्याला जनतेची साथ ही महत्त्वाची आहे आणि ही साथ मला इथल्या जनतेकडून मिळत आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित रत्नसिंधू योजनेच्या टसर रेशिम निर्मिती प्रक्रिया मार्गदर्शन व यंत्रसामुग्रा अनुदान मंजुरी मेळाव्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, सिंधुरत्न समृद्ध योजनेतून जिल्ह्यातील जवळपास पाच हजार आठशे पन्नास लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे‌. प्रशिक्षण घेतलेल्यांना सामुग्री उपलब्ध करून देण्यात आल्यान त्याचे उत्पन्न सुरु होणार आहे‌. रत्नसिंधू मधून काजू बोंड प्रकियेसाठी लागेल ते सहकार्य केलं जाणार आहे. तर काजू संदर्भात ब्राझील सोबत सरकार करार करणार आहे. काजूचा रस मोठ्याप्रमाणात घेतला जाणार आहे. काजूच उत्पादन वाढविण्यासाठी पाणी देण्यासह बी खरेदी करण्याची योजना करण्यात आली आहे. अर्थखात्याकडून आपल्या संपूर्ण सहकार्य मिळेल. आईन या झाडापासून टसर रेशीम निर्मिती प्रकल्पासाठी ६० लाख रूपये प्रशासनाकडे दिले आहेत. तर शेतजमीन वापरात यावी यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. सिंधुदुर्गतील कोणतीही शेतजमीन रिकामी राहणार नाही याची कृषी विभागाकडून काळजी घेतली जात आहे. दोडामार्गमध्ये पाटाच पाणी जाणाऱ्या भागात हळदीच पीक घेण्यासाठी प्रयत्न आहेत. दुसरीकडे पर्यटनाच्या सगळ्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. ज्यावेळी प्रकल्प बांधून पूर्ण होईल त्यावेळी सबसिडी देखील दिली जाईल. यामध्ये टेन्ट आणि निवासी योजना यातून तब्बल दोनशे लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. भविष्यात पर्यटन वाढीसाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे. प्रत्येक गोष्ट मतांसाठी करायची नसते. टीका करणारे टीका करत राहतात‌. आपण कामाला महत्त्व द्यायचं असतं. तुमची सगळ्यांची साथ लाभल्यास सिंधुरत्न समृद्ध योजना निश्चित यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर यावेळी सिंधू रत्न योजने अंतर्गत काजू बोंडू प्रक्रिया उद्योगासाठी प्रस्ताव सादर केलेल्या २०० लाभार्थ्यांना तसेच अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १२ बचतगटांच्या माध्यमातून १०० लाभार्थ्यांना मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मंजुरी पत्र देण्यात आले. तसेच टसर रेशीम उद्योगासाठी १०० लाभार्थ्यांना अर्ज वाटप करण्यात आले. तर कुक्कुटपालन व गाई पालन व्यवसायासाठी आवश्यक संसाधने व कुक्कुटग्राम यासाठी च्या मंजुरी पत्रांचेही मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.आचारसंहितेनंतर उर्वरित प्रस्ताव देखील त्वरित मंजूर करण्यात येतील असे आश्वासन यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. काजू बी संदर्भात सरकार ब्राझील सोबत करार करणार आहेत.

यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष बाबा मोडकर, उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत,जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या डाॅ. ज्योती खरे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री बुधावले, चांदवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, शिंदे सेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, डॉ.योगेश फोंडे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, गुणाजी गावडे, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, सौरभ परब आदी शिंदे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले.