महसूल पंधरवडा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा

तहसीलदार ओंकार ओतारी यांचं आवाहन
Edited by: दिपेश परब
Published on: August 02, 2024 08:09 AM
views 430  views

वेंगुर्ला : सर्व शासकीय विभागांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशाने शासनाने हा महसूल पंधरवडा कार्यक्रम आयोजित केला आहे. महसूल विभागाकडे काही नव्याने अधिकार प्राप्त झाले आहेत, त्यामुळे आता आपण जमिनीपुरते मर्यादित नाही तर नागरिकांच्या जन्म आणि मृत्यू पर्यंत त्यांच्याशी निगडित झालो आहोत. या पंधरवड्यात प्रत्येक कार्यक्रम कसा होणार आहे, याची आखणी जिल्हाधिकारी यांनी केली आहे. तुम्ही सर्व अधिकारी कर्मचारी आम्हाला बळ देता, तेव्हा आम्ही जनतेसमोर त्या ताकतीने उभे राहतो, जनतेची कामे करतो. हा पंधरवडा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. तुमचे काम चांगले आहे आणि भविष्यात या कामाची नोंद घेतली जाणार असल्याचे वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांनी सांगितले. 

येथील तहसील कार्यालयात गुरुवारी (१ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या महसुलदिन व महसूल पंधरवडा शुभारंभ कार्यक्रमात तलसीलदार ओंकार ओतारी बोलत होते. यावेळी वेंगुर्ले भूमिअभिलेखचे उपअधीक्षक श्री ठाकरे यांच्यासाहित वेंगुर्ले तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात सन २०२३-२३ या वर्षात महसूल विभागाच्या धोरण व उद्दीष्टांप्रमाणे काम करून शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार लावल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना भूमिअभिलेखचे उपअधीक्षक श्री ठाकरे म्हणाले की, सर्व जनतेला आवश्यक व शक्य तेवढी माहिती पुरवण्यासाठीचा आपण संकल्प करूया. शासनाने निर्देशित केलेला कार्यक्रम प्रत्येक दिवशी करून यशस्वी करूया. भूमिअभिलेख तर्फे आवश्यक ते सर्व सहकार्य करून माहिती पुरवण्यात येईल असे त्यांनी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अव्वल कारकून राजेश परब यांनी करत महसूल पंधरवड्या संदर्भात उपस्थितीताना माहिती दिली.