
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने त्यावर आधारित उद्योग आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे. तसेच दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमधील भुखंड दर कमी करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेतली जाईल. येत्या १५ दिवसांत हे निर्णय होतील. तर ज्यांनी जागा अडवून ठेवल्यात अशा उद्योजकांना नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, आडाळी एमआयडीसीमध्ये येऊ पहाणाऱ्या फार्मासिटिकल उद्योजकांची आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने बैठक झाली आहे. आडाळी एमआयडीसी दर जास्त आहेत ते कमी करण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने या ठिकाणी पर्यटनावर आधारित प्रकल्प आणले पाहिजेत. त्यासाठी आपण आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्या विचारांने निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असूनही रूग्णांना गोवा राज्यात जावं लागतं असे विचारले असता ते म्हणाले, आपण याबाबत नक्कीच आढावा घेऊन बोलेन. रत्नागिरीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर व साधने कमी करु दिली नाही. तसेच उद्योजकांना त्यांच्या शर्ती नुसार सवलत दिली आहे. उद्योजक आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना बळजबरीने आणू शकत नाही. आवश्यक सुविधा पुरवून सिंधुदुर्गचा सुपुत्र म्हणून रोजगारासाठी काम करेन असे मत व्यक्त केले.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेबाबत विचारले असता ते म्हणाले, ते कुटुंब म्हणून एकत्र येत असतील तर कोणाचं काही म्हणणं असण्याचे कारण नाही. पण, राज ठाकरे कोणाच्या अटी मानतील असे नाही. आम्ही शाळेत असताना यांच्याकडे जाऊ नकोस म्हणून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. बालिशपणाला राज ठाकरे दबणार नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहू नकोस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मैत्री ठेवू नकोस म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो बालिशपणा असल्याचा टोला उध्दव ठाकरे यांना सामंत यांनी लगावला.