गुणवत्तेला चकाकी देणाऱ्या शैक्षणिक संस्था सिंधुदुर्गात उभ्या रहाव्यात : प्रा. मोहन कुंभार

नांदगाव येथे श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा
Edited by:
Published on: June 28, 2024 05:13 AM
views 48  views

कणकवली : सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, हे पुन्हा पुन्हा निकालातून सिद्ध झाले आहे. पण काही वर्षानंतर हे विद्यार्थी गायब होतात कुठे? महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेताना हे विद्यार्थी दृष्टीस पडत नाहीत. कारण सिंधुदुर्गमध्ये अशा प्रकारचे मार्गदर्शन होत नाही. त्यानंतर विद्यार्थी कुठेतरी छोट्या मोठ्या नोकऱ्या करतात. आपल्याकडे असलेले टॅलेंट वाया घालवतात. त्याला जसे पालक जबाबदार आहेत. तशी इथली राजकीय आणि शैक्षणिक व्यवस्था ही जबाबदार ठरते. उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था अधिक सक्षमपणे सिंधुदुर्गात उभ्या राहिल्या पाहिजेत असे  प्रतिपादन साहित्यिक, संवादक प्रा.मोहन कुंभार यांनी केले. कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगाव आणि नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था नांदगाव  तसेच सरस्वती हायस्कूल नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या प्रमुुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शालांत परीक्षेत प्रथम  जिल्ह्यातीलतीन क्रमांकाने  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये, संस्थेचे खजिनदार सुभाष बिडये, प्रमुख  मार्गदर्शक   साहित्यिक, संवादक प्रा. मोहन कुंभार, प्रसिद्ध निवेदक  राजेश कदम  ,ज्येष्ठ सल्लागार मनोहर प्रभूखोत, पालक सभेचे सदस्य मारुती मोरये, प्रशालाचे मुख्याध्यापक सुधीर तांबे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात माध्यमिक शालांत परीक्षेत  प्रथम क्रमांक-निधी प्रकाश सावंत व  सौजन्या संजय घाटकर , व्दितीय- अर्पिता अमोल सावंत ,कैवल्य सागर मिसाळ तृतीय- गायत्री विजयकुमार राठोड , तसेच नांदगाव हायस्कूल मधील प्रथम क्रमांक - ओम राजेश देसाई , द्वितीय-अथर्व अंकुश सदडेकर, तृतीय -नेहा संतोष कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा.मोहन कुंभार म्हणाले की, सिंधुदुर्गात स्पर्धा परीक्षा करिता शैक्षणिक वातावरण नाही. पुणे मुंबई सारख्या शहरात विद्यार्थी जाऊन उभे राहण्याचा प्रयत्न करतात. जर आपल्या मुलांनी आपले टॅलेंट सिद्ध करावयाचे असे वाटले तर त्यांच्या पाठीशी आर्थिक आणि मानसिक दृष्टया भक्कम उभे राहणे गरजेचेेचे आहे.  शैक्षणिक, बौद्धिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक विकास साधताना आजच्या गळेकापू स्पर्धेमध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही. याचीही दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. 

नांदगाव पंचक्रोशी  माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नागेश मोरये म्हणाले, विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि प्रामाणिकपणा जोपासायला हवा. विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी ठेवून अभ्यास केल्यास यश मिळते. जीवनातील प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी अपार कष्ट करण्याची गरज आहे. तसेच राजेश कदम यांनीही मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर तांबे तर सूत्रसंचालन  संजय सावंत यांनी केले.