चौकुळ शाळेच्या डिजिटल QR दिनदर्शिकेचं शिक्षणमंत्र्यांनी केलं कौतुक

Edited by: विनायक गांवस
Published on: May 06, 2025 19:31 PM
views 23  views

सावंतवाडी : तालुक्यातील चौकुळ केंद्रात असलेली जिल्हा परिषद शाळा चौकुळ नं. 4 शाळेचे उपक्रम कौतुकास्पद असून शिक्षक जावेद तांबोळी यांनी काढलेले डिजिटल क्यू आर कोड दिनदर्शिका नावीन्यपूर्ण असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. सातारा येथील सैनिक स्कुल येथे आयोजित विभागीय शिक्षण परिषदेत त्यांनी या दिनदर्शिकेचे कौतुक केले.

सातारा येथील सैनिक स्कुल येथे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील उपक्रमशील, गुणवंत शिक्षकांची विभागीय शिक्षण परिषद शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षेतेखाली आयोजित करण्यात आली होती. शनिवारी झालेल्या या परिषदेस शिक्षण आयुक्त सचिन्द्रप्रताप सिंह, एससीईआरटी चे अध्यक्ष राहुल रेखावार उपस्थित होते. या परिषदेत शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ केंद्रातील चौकुळ नं. 4 या शाळेतील नवनियुक्त शिक्षक जावेद तांबोळी यांनी आतापर्यंत राबवलेले नाविण्यपुर्ण उपक्रम क्यू आर कोड च्या माध्यमातून डिजिटल दिनदर्शिकेमध्ये एकत्र केले. काही दिवसापूर्वी शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, उपशिक्षणाधिकारी आंगणे, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांच्या हस्ते करण्यात आले होते. शिक्षक तांबोळी यांनी शाळेत राबवलेले सर्व नावीन्यपूर्ण उपक्रम या दिनदर्शिकेत क्यू आर कोड स्वरूपात आहेत. क्यू आर कोड स्कॅन करताच मोबाईलवर शाळेचा उपक्रम येतो.

शनिवारी झालेल्या या शिक्षण परिषदेत मंत्री भुसे यांनी या दिनदर्शिकेची दखल घेत चौकुळ नं. 4 शाळेचे उपक्रम व दिनदर्शिकेचे कौतुक केले. यावेळी शिक्षण आयुक्त सचिन्द्रप्रताप सिंह, एस सीई आरटी चे अध्यक्ष राहुल रेखावार, शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, बांदा पी. एमश्री शाळेचे शिक्षक जकाप्पा पाटील उपस्थिती होते.