'सिंधुरत्न'तून कोकणात शाश्वत विकासाचं मॉडेल राबवणार

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचं वक्तव्य
Edited by: भरत केसरकर
Published on: December 23, 2023 19:42 PM
views 98  views

सावंतवाडी : सिंधुरत्न समृद्ध योजनेतून कोकणात शाश्वत विकासाचे मॉडेल राबविण्यात येणार आहे. ही योजना पथदर्शी असून येथील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बचत गट सक्षम झाल्यास त्या गटाला जोडली गेलेली कुटुंबे देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. यासाठी या योजनेअंतर्गत उपलब्ध होणार्‍या विविध रोजगारांसाठी महिलांनी स्वतःहून पुढे येणे गरजेचे आहे असे मत सिंधूरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष तथा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
     
सावंतवाडी नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व सिंधरत्न समृद्धी योजना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नगरपालिका हद्दीतील महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तत्पूर्वी या मेळाव्याचे उद्घाटन मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सागर साळुंखे, सिंधू रत्न समृद्धी योजनेचे प्रकल्प व्यवस्थापक आनंद तेंडुलकर, कृषी विभागाच्या पी एम एफ विभागाचे क्षेत्रीय अधिकारी योगेश वालावलकर, आर्किटेक्ट अमित कामत, सूरज परब, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शहर अभियान व्यवस्थापक एकनाथ पाटील, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, नगरसेविका दिपाली भालेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना केसरकर म्हणाले, शहरातील महिलांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यांनी त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. बॅ.नाथ पै सभागृह, काझी शहाबुद्दीन सभागृह तसेच जगन्नाथराव भोसले उद्यानातील कँटीन चालवायला द्यायचे असून महिला बचत गटांनी त्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक सर्व मदत नगरपालिका प्रशासनाकडून केली जाईल. मोती तलावातील बोटिंग क्लबच्या ठिकाणी स्नॅक्स व फास्ट फुडचे स्टॉल उभारण्यात येणार असून ते देखील महिलांनाच चालवायला देण्यात येणार आहेत. तसेच तलावातील बोटिंग संदर्भात काही महिला इच्छुक असतील तर त्याचे देखील प्रशिक्षण महिलांना दिले जाईल. त्याठिकाणी आवश्यक असलेल्या तिकीट काउंटरवर देखील महिलांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. यासंदर्भात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन ज्या-ज्या महिला जे-जे उद्योग करण्यासाठी इच्छुक आहेत, त्या संदर्भात चर्चा करून त्यांना रोजगार निर्माण करून दिले जातील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

शहरातील समाजमंदिराच्या सेंटरमध्ये फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करण्यात येणार आहे. तसेच स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये एका मजल्यावर काथ्या उद्योगासाठी जागा राखून ठेवण्यात आली असून काथ्या उद्योगासाठी इच्छुक महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे झिरंग व गरड अशा शहराच्या ग्रामीण भागात कुक्कुटपालन तसेच अंडी उत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. आम्ही सर्व पूर्व मात्र कष्ट तुम्हालाच करायचे आहेत त्यासाठी महिलांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले.यावेळी त्यांनी सिंधूरत्न समृद्ध योजने संदर्भात विस्तृत माहिती दिली. या योजनेतून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी महिलांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन गजानन परब यांनी केले. यावेळी सावंतवाडी शहरातील महिला बचत गट व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.