
वैभववाडी : शासनाने जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे.प्रत्येक जिल्ह्यात अनेक डिएड,बीएड बेरोजगार आहेत.त्यांना हे काम देणे गरजेचे होते.मात्र शासनाने अशा तरुणांना रोजगार देण्याऐवजी त्याच्यावर अन्याय केला आहे.हा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा .असं मत उंबर्डे गावचे माजी सरपंच तथा निवृत्त मुख्याध्यापक शेरपुद्दीन बोबडे यांनी व्यक्त केले.
जिल्हा अंतर्गत बदली तसेच गेली कित्येक वर्षे न झालेल्या शिक्षक भरतींमुळे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा झाल्या आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये शुन्य शिक्षक अशी अवस्था आहे.या शाळांमध्ये शिक्षक नेमण्यासाठी राज्य सरकारने नवीन शासन निर्णय घेतला.यामध्ये निवृत्त शिक्षकांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने रिक्त जागांवर नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
शासनाच्या या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होत आहे.या निर्णयाविरोधात श्री बोबडे यांनी आपलं परखड मत व्यक्त केले.जिल्ह्यात अनेक शाळा या शिक्षकांविना आहेत.अशा शाळांवर शिक्षक म्हणून स्थानिक बीएड, डीएड धारक तरुणांना संधी देणे आवश्यक होते.जिल्ह्यातील अनेक तरुण अध्यापनाचे शिक्षण घेऊन रोजगारांविना आहेत.यानिमित्ताने त्यांना रोजगार उपलब्ध झाला असता.मात्र शासनाने घेतला हा निर्णय अन्यायकारक आहे.सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी शासनाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक होते.शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा असं मत श्री बोबडे यांनी व्यक्त केले.