शेवटच्या घटका मोजतेय घोटगेवाडीतील शाळा

शिक्षण विभाग सुशेगात..?
Edited by: लवू परब
Published on: October 25, 2024 13:28 PM
views 236  views

दोडामार्ग | लवू परब : एकीकडे निवडणुकीची धामधूम सूरू असताना दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथील  150 वर्षातील सर्वात जुनी प्राथमिक शाळा आज जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत असताना शिक्षण विभाग मात्र सुशेगात असल्याचे दिसत आहे. 2016 साल पासून निर्लेखन ची ग्रामस्थांची मागणी असलेली शाळा अद्याप पर्यंत का निर्लेखित झाली नाही? शिक्षण विभाग कोणाच्या मृत्युची वाट बघतेय काय? असा संतापजनक सवाल उपस्थित घोटगेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.

घोटगेवाडी प्राथमिक शाळा आज मृत्युंच्या दाडेत सापडली आहे. 2016 साली येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी सदरची शाळा निर्लेखित करावी यासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवला मात्र पाठवलेला प्रस्ताव धुळखात पडला आहे. सदरच्या शाळेचा काही भाग कोसळून पडला आहे. मग अशी परिस्तिती असताना शिक्षण विभाग करते तरी काय? कोणाचा जीव गेल्याशिवाय शिक्षण विभाग जागे होणार नाही काय? अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून केल्या जात आहेत.  

9 वर्षे निर्लेखित प्रस्ताव धुळखात

घोटगेवाडी येथील प्राथमिक शाळा पूर्णतः मोडकळीस आली या अनुशंगाने शाळा व्यवस्तापन समितीने 2016 मध्ये शाळा निर्लेखित करण्या संदर्भात प्रस्ताव पाठवला. मात्र, सदरचा प्रस्ताव गेली 9 वर्षे शिक्षण विभागात धूळखात पडल्याचे आज शिक्षण विभागाला भेट दिल्या नंतर समजले. या संदर्भात विचारणा केली असता सदर प्रस्ताव काही कागदो पत्री त्रुटी मुळे पुन्हा वापस आल्याचे दोडामार्ग शिक्षण विभागाने सांगितले.

कागदो पत्री त्रुटी पूर्ण करून पुन्हा प्रस्ताव पाठवणार : गटशिक्षण अधिकारी नदाफ

या संदर्भात दोडामार्ग गटशिक्षण अधिकारी नदाफ यांना फोन द्वारे माहिती विचारली असता सदर निर्लेखन प्रस्ताव पंचायत समिती, व तहसीलदार यांचा अहवाल या कागदपत्रामुळे प्रस्ताव परत वापस आला तर ही कागदपत्रे पूर्ण करून सदरचा प्रस्ताव परत पाठवण्यात येईल असे त्यांनी सांगितले

कोणा मुलांचा जीव गेल्यास जबाबदार कोण : बाबली दळवी, ग्रामस्थ

दोडामार्ग तालुक्यातील सर्वात जुनी शाळा आणि साधारण 150 वर्षे पूर्ण झालेली ही शाळा आहे. सदर शाळेची स्थिती बघितली तर ही शाळा कुठच्या ही क्षणी जमीन दोस्त होऊ शकते तर या ठिकाणी शाळेतील मुले बाहेर खेळत असतात त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी शासन म्हणजे शिक्षण विभाग जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर यां शाळेचे तात्काळ निर्लेखन प्रस्ताव मंजूर करून या ठिकाणी नवीन सुसज्ज शाळा बांधण्यात यावी एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे.

मुलांच्या दृष्टीने दखल घेऊन शाळा निर्लेखन करा : अतुल कर्पे 

घोटागे वाडी ही शाळा खूप जुनी आहे 1982 साली आम्ही या शाळेत शिकलो त्यावेळी या शाळेची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली मात्र आज पर्यंत या शाळेची परत डागडुजी केली नाही म्हणून आज ही शाळा पूर्णपणे मोदकळीस आली आहे. कोणत्याही क्षणी ही शाळा कोसळू शकते त्यामुळे मुलांच्या जीवाचा विचार करून शासनाने तात्काळ ही शाळा निर्लेखन करावी एवढीच आमची मागणी आहे.