'त्या' अपघात प्रकरणी एडगाव ग्रामस्थांची पोलीसात धाव !

ट्रक चालक व मालकाला तात्काळ हजर करण्याची मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 03, 2024 05:30 AM
views 1042  views

वैभववाडी : एडगाव शुकनदीपुलानजीक झालेल्या त्या अपघातातील ट्रक चालकासहीत मालकाला तात्काळ हजर करावे या मागणीसाठी एडगाव ग्रामस्थांनी आज सकाळी पोलीस ठाण्यात गर्दी केली. जोपर्यंत त्यांना हजर करीत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसमोल यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपला निर्णय मागे घेतला.

    मंगळवारी रात्री ७.३०वा शुकनदीपुलानजीक ट्रक व दुचाकी यांचा अपघात झाला होता. या अपघात एडगाव येथील पादचारी रामचंद्र आकाराम रावराणे हे गंभीर झाले होते. त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला होता. तो अद्याप पोलीस ठाण्यात हजर न झाल्याने आज एडगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. ट्रक चालक व मालक यांना तात्काळ हजर करा अशी मागणी पोलीसांकडे केली. त्यांना हजर न केल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती.

अखेर श्री.अवसरमोल यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. ट्रक चालकांवर रात्रीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध आम्ही घेत आहोत. तसेच ट्रक मालकाला ताब्यात घेण्यासाठी पथक पाठविण्यात आले असल्याचे सांगितले. काही तासात दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर करण्यात येईल असं आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. पोलीस ठाण्यात जमलेली गर्दी पांगली. यावेळी जयेंद्र रावराणे, हिंदुराव पाटील, विनोद रावराणे, राजू पवार, सचिन रावराणे, संतोष पाटील, हेमंत रावराणे यासह एडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.