
देवगड : देवगड येथील तारामुंबरी प्राथमिक शाळेत नागाच्या इको फ्रेंडली मुर्त्यांचे प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले . नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे.घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.येत्या नागपंचमीला पूजनासाठी कागदी लगद्यापासून नागाच्या पर्यावरण पूरक मुर्त्या तयार करण्याचे नियोजन एक महिन्यापूर्वीच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी केले आणि आनंददायी शनिवारी ' कागद ते मूर्ती 'हा प्रवास पूर्ण करून नागाच्या मूर्ती साकार झाल्या.
या मूर्तींचे प्रदर्शन बुधवारी तारामुंबरी शाळेत मांडण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा डाएटचे अधिव्याख्याता डॉ . एल.बी.आचरेकर सर देवगड केंद्राच्या केंद्रप्रमुख स्नेहा पारकर मॅडम ,देवगड गटसाधन केंद्र विषयतज्ज्ञ नारायण चव्हाण सर, गायकवाड सर, आरेकर सर तसेच कदम मॅडम, मोंडकर मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कल्याणी जोशी तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे विनायक धुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पालकांमधून संतोष परब, रुपेश लाड, धनश्री जोशी, विनायक प्रभू व शिक्षणप्रेमी धर्मराज जोशी ,सागर कोयंडे उपस्थित होते
यावेळी शाळेतील विद्यार्थी ओम पटणकर व क्रिथिकेश जोशी यांनी ' कागद ते मूर्ती'हा प्रवास करतानाच्या कृती कथन केल्या.उपशिक्षिका सुखदा गोगटे यांनी उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिली.केंद्रप्रमुख स्नेहा पारकर यांनी शाळेत वेळोवेळी घेण्यात आलेल्या कंपोस्ट खत, झाप विणणे, फुलपाखरू संवर्धन या उपक्रमाबद्दल उल्लेख करून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
या कार्यक्रमांत डाएट सिंधुदुर्ग अधिव्याख्याता डॉ .एल .बी.आचरेकर सर विचार व्यक्त करताना म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विविध प्रकारचे ट्रेड उदा.चित्रकला,पेंटिंग,फिशिंग,सुतारकाम अशा ट्रेडमध्ये विद्यार्थी इयत्ता नववी पासून सहभागी होऊ शकतात त्यानुसार या शाळेत खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी दोन्ही शिक्षकांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरू केलेली आहे.तसेच शाळेत शिक्षण सप्ताह प्रभावीपणे राबविल्याचा उल्लेख ही त्यांनी आवर्जून केला.इको फ्रेंडली मूर्ती तयार करण्याच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण दिले आहे आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत आवडीने प्रत्येक कृती करून निश्चितच कौशल्य आत्मसात केली आहेत असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात विद्यार्थी प्रतिनिधी चिन्मय तारकर याने उपस्थितांचे स्वागत तर मुख्याध्यापक संदीप परब यांनी प्रस्तावना केली. तर उपशिक्षिका सुखदा गोगटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.