घुसखोरी केलेल्या कर्नाटकमधील हायस्पीड ट्रॉलरवर भल्या पहाटे कारवाई

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 19, 2024 05:51 AM
views 191  views

मालवण : सागरी किनारपट्टीवरील मालवण तारकर्ली समोर महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर मत्स्य विभागाने शनिवारी पहाटे कारवाई करत ताब्यात घेतला आहे. पापलेट, सौदाळा, बांगडा, सुरमई, कट्टर, बळा, कटल यांसह अन्य मासे ट्रॉलर मध्ये मोठया प्रमाणात असून त्याचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी हायस्पीड ट्रॉलर सर्जेकोट जेटी येथे आणण्यात आला आहे.

मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग-मालवण सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री सागरी गस्ती दरम्यान परवाना अधिकारी मालवण मुरारी भालेकर सोबत सहकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक/ रक्षक दीपेश मायबा, सागर परब, मिमोह जाधव, राजेश कुबल, प्रणित मुणगेकर, स्वप्नील सावजी., पोलीस कॉन्स्टेबल व्ही. व्ही. पाटोळे यांनी कर्नाटक- मलपे येथील नौका वायुपुत्र-२ क्रमांक IND-KA-02-MM-5812 महाराष्ट्र राज्याच्या जलाधी  क्षेत्रात अवैध्य मासेमारी करताना पकडण्यात आली आहे. सदर नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. असे सांगितले.

मच्छिमार संतप्त 

मालवण सागरी किनारपट्टी भागात कर्नाटक मलपी तसेच अन्य राज्यातील हायस्पीड ट्रॉलर गेले काही दिवस सातत्याने मोठया संख्येने घुसखोरी करून रात्रीच्या वेळी मासळीची लूट करतात. स्थानिक मच्छिमारांची जाळी तोडून नुकसान करतात. असे असताना एका ट्रॉलरवर कारवाई नको तरी अधिक कारवाई झाली पाहिजे. तसेच पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भुमिका मांडली आहे. आता पुढील कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे.