
चिपळूण : चिपळूण पोलिस उपविभागात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या फेरबदलांतर्गत प्रकाश वसंत बेळे (वय 57) यांची उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, मुंबई पोलीस शांताराम शिंदे, राजेश सुतार, नरेंद्र चव्हाण, अनंत चव्हाण, अजय यादव, संदेश गोरीवले, नयन चव्हाण, आशुतोष गोरीवले आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
पदभार स्वीकारल्यानंतर श्री. बेळे यांनी गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणि नागरिकांशी सुसंवाद वाढवणे हे आपले प्राधान्य असल्याचे सांगितले.
श्री. बेळे यांची पोलीस सेवेतली कारकीर्द तब्बल 37 वर्षांची आहे. 1 नोव्हेंबर 1988 रोजी मरोळ, मुंबई येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. 1983 साली वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी पोलीस सेवेत प्रवेश घेतला.
1994-96 दरम्यान भोईवाडा पोलीस ठाण्यात पीएसआय, त्यानंतर गोरेगाव येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 2003 साली ट्रॅफिक पोलीस विभागात सहाय्यक पोलीस निरीक्षक, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे डीवायएसपी अशी पदोन्नतीची वाटचाल त्यांनी केली. अलीकडे ते ताडदेव येथे सशस्त्र पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेथून त्यांची बदली चिपळूण येथे झाली आहे.