
दोडामार्ग : दोडामार्ग विजघर मार्गावर कुडासे तिठा येथे खडी वाहतूक करणाऱ्या डंपरने मोर्ले येथील प्रसाद तुकाराम कांबळे, वय 27 या युवकाचा बळी घेतला आहे. मात्र अपघाताचा पंचनामा करण्याअगोदरच डंपर मालकाने गाडी घटनास्थळावरून हलवण्याची मुजोरी केली आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांना धारेवर धरत जाब विचारला. यावेळी मोर्ले गावातील तसेच तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या जमा झाले. विशेष म्हणजे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी असून सुद्धा त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित झालंय.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोर्ले येथून आपल्या घराकडून सकाळी गोवा येथे कामाला जाण्यासाठी प्रसाद कांबळे हा युवक भेडशी मार्गे गोव्याला जायला निघाला. तो कुडासे तिठा येथे पोहचला असता त्याच्या समोर खडी वाहतूक करणारा डंपर चालक होता. अचानक खडी वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने गाडी डाव्या बाजूला वळविली. डंपरला साईड लाईट नसल्याने पाटीमागून असणाऱ्या प्रसादला काहीच समजले नाही. त्यामुळे पाठीमागून असणाऱ्या दुचाकीस्वार प्रसाद कांबळे याची दुचाकी डंपरच्या मागच्या टायर खाली पडली. त्यावेळी पाठीमागचे चाक प्रासादच्या पोटावर चढले. आणि तेथेच तो गंभीर जखमी झाला. यावेळी घटनास्थळी आलेल्या मोर्ले गावचे सरपंच संजना धुमास्कर व उपसरपंच संतोष मोर्ये, मदन राणे यांनी खासगी गाडीत घालून त्याला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. यावेळी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तो गंभीर जखमी असल्याने गोवा येथील बांबोळी येथे पाठविण्यात आले. त्यानंतर घटना स्थळी पुन्हा जमलेल्या मोर्ले ग्रामस्थ आणि डंपर चालक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी उपस्थित दोडामार्ग पोलिसांनाही ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. अपघात घडला असताना अपघाताचा पंचनामा करण्याअगोदर अपघात ग्रस्त वाहने कोणाच्या सांगण्यावरून हलविण्यात आली. या प्रश्नावर पोलिस निरुत्तर झाले. यावेळी आक्रमक ग्रामस्थांनी दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात जमा करा आणि संबंधित वाहन चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. यावेळी मोर्ले सरपंच संजना धुमास्कर, उपसरपंच संतोष मोर्ये, गोपाळ गवस, पंकज गवस, प्रथमेश गवस व इतर ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोडामार्ग पोलीस पीएसआय आनंद नाईक, गजानन मळगावकर यांनी दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणली.
जिल्हा वाहतूक पोलिसांचे पलायन
आज गुरुवारी सकाळी जिल्हा वाहतूक पोलीस दोडामार्ग विजघर मार्गावर कुडासे तिठा येथे वाहनांची तपासणी करण्यासाठी आले होते. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ते वाहतूक पोलीस ज्या ठिकाणी उभे होते त्याच ठिकाणी हा अपघात घडला. यावेळी त्या ठिकाणी असलेले वाहतूक पोलीस जानू बोडेकर, भोगले, झापू पवार या पोलिसांनी वाहने पंचनामा करेपर्यंत तिथे थांबून जखमीला मदत कार्य करण्याची गरज होती. मात्र असे न करता फक्त फोटो काढण्याचे काम केले. या अपघातात आमचा काही विषय नाही ते दोडामार्ग पोलीस बघतील असे सांगून व पोलीस पंचनाम करण्यात अगोदरच ही वाहने बाजूला करून घटना स्थळवरून पलायन केले.
पोलिसांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
दरम्यान अपघातस्थळी असलेल्या जिल्हा वाहतूक पोलिसांनी कोणतीही मदत कार्य किंवा कठोर भूमिका न घेता तेथून पळ काढल्याने मोर्ले ग्रामस्थ आक्रमक झाले. मग हे पोलीस या ठिकाणी कशासाठी आले होते ? मदत कार्य किंवा आपले कार्य विसरून ते फक्त पैसे गोळा करण्यासाठी आले होते काय ? असा सवाल ग्रामस्थांनी केला. संबंधित जानू बोडेकर, भोगले, झापू पवार या पोलिसांवर जिल्हा पोलीस निरीक्षक सौरभकुमार अग्रवाल कारवाई करणार काय ? यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
गोवा कला अकादमीत होता शिक्षक
प्रसाद हा जन्मल्यापासून लगतच्या गोवा राज्यातच शिकायला होता. शिक्षण घेत असताना संगीत या विषयाकडे जास्त भर दिला. कॉलेज झाल्यावर त्याने गायन, पेटी, तबला ही वाद्य शिकला. तो गोव्यात उत्कृष्ट गायक म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर तो गोवा येथील कलाअकादमी येथे संगीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिक्षण देत होता. आज तो आपल्या मुळ गावी मोर्ले येथून गोव्याला जातं असताना त्याच्यावर काळाने घाला घातला आणि त्याचे संगीत सूर इथेच थांबलेत. त्याच्या पश्चात आई - वडील, 3 भाऊ, 3 बहिणी असा परिवार आहे.
‘आई घाबरू नकोस, मी येणार नक्की!’
प्रसादला जखमी अवस्थेत पाहून आईचे काळीज पिळवटून गेले. तिने तिथेच हंबरडा फोडला, पण जाता, जाता स्ट्रेचरजरून प्रसादने तिचा हात हातात घेतला, आणि म्हणाला, ‘आई घाबरू नकोस, मी येणार नक्की!’ हे शब्द कानी पडलेल्या रुग्णालयातील कर्मचार्यांचे डोळेही पाणावले. रुग्णालयातील तो आई आणि लेकराचा शेवटचा संवाद ठरला. कंठातला स्वर स्तब्ध झाला, अन् विणेच्या ताराही क्षणभर कंप पावल्या. निधनाची बातमी येताच मोर्ले गावातील या युवा कलाकारासाठी प्रत्येक जण हळहळला. जणू मृत्यूही ओशाळला!
अपघातानंतर नातलगांसह स्थानिक ग्रामस्थांचा उद्रेक वाढला. त्यांनी थेट पोलीस ठाण्याला धडक दिली. अपघातावेळी खडी भरलेला डंपर वाहतूक पोलीस असताना देखील कसा काय खाली होतो ? असा उद्विग्न सवाल ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना विचारला. तसेच डंपर चालकावर गंभीर गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी निसर्ग ओतारी यांनी होकार दर्शविला. सायंकाळी उशिरापर्यंत जाब जबाब नोंदवण्याचे प्रक्रिया सुरू होती.